सांगली लोकसभा मतदारसंघ: भाजप उमेदवार संजय पाटील यांना स्वाभिमानीच्या विशाल पाटल यांचे आव्हान, गोपीचंद पडळकर ठरणार किंगमेकर
एकूणच काय तर सांगलीत असलेल्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे जनतेचे लक्ष आहे. मतदार आणि स्थानिक नेत्यांशी संवाध साधला असता भाजप उमेदवार संजय पाटील यांच्यासमोर स्वाभिमानीच्या विशाल पाटलांचे आव्हान, गोपीचंद पडळकर ठरणार किंगमेकर अशी चर्चा कानी पडते.
Lok Sabha Elections 2019: सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) लोकसभा निवडणूक 2019 मध्ये तिरंगी लढतीमुळे चर्चेत आहे. आजवर काँग्रेस विरुद्ध भाजप अशा दुहेरी समजल्या जाणाऱ्या सामन्यात काँग्रेसचा विजय निकालापूर्वीच पक्का समजला जायचा. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना रंगला आणि भाजपने संजय पाटील (Sanjay Patil) यांच्या रुपाने बाजी मारली. आताच्या निवडणुकीतही सांगलीत सामना तिरंगी असून, भाजप तर्फे विद्यमान खासदार संजय पाटील, काँग्रेस, राष्ट्रवादी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटना तर्फे विशाल पाटील आणि प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांच्या वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) तर्फे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे रिंगणात आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. सांगली म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच सांगली. असे या मतदारसंघाचे स्वरुप. आणीबाणीनंतर आलेल्या इंदिरा गांधी विरोधी लाटेतही या मतदारसंघातील मतदार काँग्रेस पक्षासोबतच राहिले. याला अपवाद ठरले 2014 हे वर्ष. या वर्षात झालेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस विरोधी लाटेत भाजप उमेदवार संजय पाटील हे विजयी झाले. आता या मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय पाटील यांना मतदारसंघात उतरवले आहे.
खरे म्हणजे सांगली हा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते दिवंगत वसंत दादा पाटील यांचा मतदारसंघ. वंसतदांदी 70 / 80 च्या दशकात केलेली या मतदारसंघातील बांधणी पुढे अनेक वर्षे (2014 पर्यंत) काँग्रेस आणि दादांच्या वारसांना कामी आली. 2014 च्या निवडणुकीत जरी काँग्रेस उमेदवारांचा इथून पराभव झाला असला तरी, आजही या मतदारसंगात काँग्रेसची ताकद आहे. मात्र, लोकसभा निडवणुक 2019 साठी जागावाटप करताना प्रदेश काँग्रेसने ही जागा थेट मित्रपक्षाला सोडली. काँग्रेसच्या कोट्यातून ही जागा शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली. प्रदेश काँग्रेसच्या या निर्णयाचे तीव्र पडसात सांगली काँग्रेसमध्ये उमटले. त्यानंतर वसंत दादा घराण्याने बंड केले. माजी खासदार प्रतिक पाटील यांच्या रुपात काँग्रेस नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षांतर्गत हे बंड थोपविण्यासाठी विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी सांघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास प्रवृत्त करण्यात आले. आणि तात्पुरता तोडगा काढण्यात आला. त्यामुळे इते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार हा केवळ आणि केवळ नावालाच असून, तो पूर्णपणे काँग्रेसचाच आहे. (हेही वाचा, महाराष्ट्राचे राजकारण ढवळून टाकणारे बहुचर्चीत लोकसभा मतदारसंघ आणि लक्ष्यवेधी लढती)
दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या यादीत शेंडगे नावाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, आयत्या वेळी प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाने उमेदवार बदलत गोपीचंद पडळकर यांना तिकीट दिले. गोपीचंद पडळकर हे गेली अनेक वर्षे भाजपचे कट्टर कार्यकर्ते होते. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात. तसेच, 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पडळकर हे भाजपच्या तिकीटावरच लढले होते. असे असताना वंचित बहुजन आघाडीने गोपीचंद पडळकर यांना आयात करुन तिकीट दिले. सांगली लोकसभा मतदारसंघ हा धनगर समाज बहुल मतदारसंघ आहे. त्यामुळे आपल्या समाजाच्या मतांचा आपल्याला फायदा होईल अशी शक्यता गृहित धरुन पडळकर यांनी रान उठविण्यास सुरुवात केली आहे. तसेच, इतर समाजाचाही पाठिंबा मिळविण्यासाठी पडळकर प्रयत्नशिल आहेत. एका मर्यादेत त्याला यशही येताना दिसत आहे. मात्र प्रत्यक्ष मतदारांच्या मनात काय आहे हे सध्यातरी कळण्यास मार्ग नाही. (हेही वाचा, बुलढाणा लोकसभा मतदारसंघ: शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार, VBA ठरणार किंगमेगर)
सांगली लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ· मिरज विधानसभा मतदारसंघ · सांगली विधानसभा मतदारसंघ · पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघ · खानापूर विधानसभा मतदारसंघ · तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ · जत विधानसभा मतदारसंघ |
सांगली लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार संजय पाटील हे भाजपकडून रिंगणात आहेत. देशात आणि राज्यात भाजप सरकार आहे. पंतप्रधान मोदींचा चेहरा पुढे करुन भाजपवाले मतदारांना देशभरात आकर्शित करण्याचा प्रयत्न करत आहेत. सांगलीतही संजय काका आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा हाच प्रयत्न दिसतो. मात्र, गेल्या साडेचार-पाच वर्षात ग्रामिण भागातील जनतेला मोदी सरकारकडून फार आपेक्षा होत्या. त्या सर्वच अपेक्षा पूर्ण झाल्यात असे म्हणण्यास जागा नाही. शेतकरी कर्जमाफी, पिकविमा, पाणी, दुष्काळ, शेतमालाला हमिभाव अशा अनेक मुद्द्यांवर ग्रामिण जनतेत नाराजी आहे. नाही म्हणायला पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाद्यावर जमा झाली आहे. काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभही मिळाला आहे. मात्र, सत्तेविरोधातील खदखद जनतेमध्ये दिसते. त्यावर संजय काका काय मार्ग काढतात यावर बरेच काही अवलंबून आहे.
एकूणच काय तर सांगलीत असलेल्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे जनतेचे लक्ष आहे. मतदार आणि स्थानिक नेत्यांशी संवाध साधला असता भाजप उमेदवार संजय पाटील यांच्यासमोर स्वाभिमानीच्या विशाल पाटलांचे आव्हान, गोपीचंद पडळकर ठरणार किंगमेकर अशी चर्चा कानी पडते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)