RS Elections 2022: शिवसेनेच्या संजय राऊत, संजय पवार यांच्याकडून विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल; शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह महाविकास आघाडीतील बडे नेते उपस्थित
त्यानुसार संजय राऊतांसोबत शिवसेनेच्या संजय पवार यांनी अर्ज भरला आहे.
राज्यसभेच्या आगामी 57 जागांवर होणार्या निवडणूकीसाठी शिवसेनेकडून आज त्यांचे दोन उमेदवार संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील सहाव्या जागेवरून मोठं राजकारण रंगलं होतं. पण अखेर शिवसेनेने त्यांच्या रस्त्यावरील कडवट शिवसैनिक राज्यसभेत पाठवण्याचा आपला निर्णय ठाम केला आहे. त्यानुसार कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय जाधवांना उमेदवारी दिली आहे. आज या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते, खासदार उपस्थित होते. एनसीपी अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल देसाई, विनायक राऊत यावेळी उपस्थित होते.
संख्याबळानुसार आणि महाविकास आघाडीमध्ये झालेल्या समझोत्यानुसार यंदा शिवसेना आपला एक खासदार राज्यसभेत वाढवणार होता. त्यानुसार त्यांनी संजय पवारांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील सहाव्या जागेसाठी संभाजी छत्रपती देखील उत्सुक होते मात्र त्यांना शिवसेनेने पुरस्कृत उमेदवारी ऐवजी पक्षात प्रवेश घेऊन अधिकृत उमेदवार व्हा अशी ऑफर दिली होती. पण संभाजी छत्रपतींनी ही ऑफर नाकारली आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2022: 'महाराजांना राजकीय पक्षाचे वावडे नसावे' म्हणत संभाजीराजे छत्रपती यांचा विषय संपवला, शिवसेनेकडून संजय पवार यांना संधी).
राज्यसभेच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडे 169 चं संख्याबळ आहे तर भाजपा कडे 113 आमदार आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. यानुसार शिवसेना, एनसीपी, कॉंग्रेस आपला एक उमेदवार सहज राज्यसभेवर पाठवू शकत आहे. भाजपा देखील 2 उमेदवार पाठवू शकत आहे. ही निवडणूक 10 जून दिवशी पार पडणार आहे.
शिवसेनेकडून यंदा संजय राऊत यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. 2004 साली त्यांना पहिल्यांदा खासदारकी देण्यात आली होती. तेव्हापासून ते राज्यसभेत शिवसेनेचे नेते म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.