Narayan Rane Vs Shiv Sena: नारायण राणे विरुद्ध शिवसेना वादावर रामदास आठवले यांची प्रतिक्रिया
ज्यामुळे राज्यात नारायण राणे विरुद्ध शिवसेना असे वातावरण पाहायला मिळत आहे.
भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत अशोभनीय वक्तव्य केले होते. ज्यामुळे राज्यात नारायण राणे विरुद्ध शिवसेना असे वातावरण पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावर केंद्रीय मंत्री आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच नारायण राणे यांच्यावर झालेली अटकेची कारवाई चुकीची असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते देवचंद आंबदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त रामदास आठवले येथे आले होते. या कार्यक्रमात भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत रामदास आठवले यांनी राणे विरुद्ध शिवसेना वादावर भाष्य केले आहे. राणे विरुद्ध शिवसेना वादावर बोलताना रामदास आठवले म्हणाले आहे की, एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे, हा वाद मिटला पाहिजे, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. तसेच महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. मात्र, शिवसेना- भाजप यांच्यात मागील 35 वर्ष युती होती. अजूनही वेळ गेली नाही. उद्धव ठाकरे यांनी भल्याचा विचार केल्यास राज्यात पुन्हा शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुतीची सत्ता येऊ शकते, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Narayan Rane On Balasaheb Thackeray: 'मातोश्री'च्या बाहेर मच्छर मारत बसायचो: नारायण राणे
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसींच्या आरक्षित जागा आवश्यक आहेत.त्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. ओबीसींच्या आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक राज्यसरकार तर्फे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रीत करण्यात आले. मात्र, रिपब्लिकन पक्षाला निमंत्रित करण्यात आले नाही. याबद्दल रिपब्लिकन पक्ष तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे, असे रामदास आठवले यांनी काल (28 ऑगस्ट) ट्विट केले होते.