Parliament Special Session: संसदेच्या नव्या इमारतीमध्ये आज खासदार करणार गणेश चतुर्थी च्या मुहूर्तावर कामाचा 'श्रीगणेशा'
नव्या संसद इमारतीमध्ये कामाची सुरूवात आज महिला आरक्षणाचे विधेयकही मांडून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवी दिल्ली (New Delhi) मध्ये 18-22 सप्टेंबर दरम्यान विशेष संसदीय अधिवेशन बोलावले आहे. यामध्ये आज अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी खासदार संसदेच्या नव्या इमारती मध्ये प्रवेश करून कामाचा श्रीगणेशा करणार आहेत. काल पंतप्रधानांनी जुनी इमारत सोडण्याचा हा क्षण भावनिक असल्याचं म्हणत जुन्या संसदेप्रमाणे नव्या इमारतीमध्येही इतिहास घडवला जाईल असं म्हटलं आहे. नक्की वाचा: Parliament Special Session: 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
आज लोकसभा आणि राज्यसभा या सदनातील खासदारांना सकाळी 9 वाजता संसदेत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यावेळी जुन्या संसद भवनाच्या आवारात सर्व सदस्यांचे एकत्रित छायाचित्र घेतले जाणार आहे. त्यानंतर संसदेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये सर्व सदस्य एकत्र येणार आहेत. जुन्या इमारतीमधील काम संपवून सकाळी 11 वाजता संसदेच्या नव्या इमारतीमध्ये दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होणार आहे. नव्या इमारतीचे 28 मे दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर रविवारी नव्या इमारतीवर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आता आज सारे खासदार नव्या इमारतीमध्ये कामाला सुरूवात करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जुन्या संसदेमध्ये लोकसभेतील भाषणात महिला खासदारांची संख्या व योगदान वाढतं असाल्याच्या उल्लेख केला होता. त्यामुळे आज महिला आरक्षणाचे विधेयकही मांडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक संमत करण्याची मागणी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रातून केली होती.