Lok Sabha Elections 2019: भाजप संस्थापक लालकृष्ण आडवाणी यांचे गांधीनगर येथून तिकीट कापण्याची चर्चीत कहाणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा अप्रत्यक्षरित्या संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अनेकदा अडवाणी यांच्यासोबत चर्चेतही हा मुद्दा घेतला. परंतु, आडवाणी यांनी आपल्या उमेदवारीबाबत जाहीरपणे कधीच मतप्रदर्शन केले नाही.

BJP Founder L. K. Advani | (Photo Credit : http://blog.lkadvani.in)

Lok Sabha Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांचे राष्ट्रीय राजकारणात चांगले बस्तान बसले आणि लालकृष्ण आडवाणी (L. K. Advani) यांच्यासह पक्षातील अनेक बुजुर्गांची रवानगी थेट मार्गदर्शक मंडळात झाली. आता तर गांधीनगर लोकभा मतदारसंघातून (Gandhinagar Lok Sabha Constituency) आडवाणी यांचे तिकीट कापून भाजपतून आडवाणी युगाचा अस्तच केल्याचे बोलले जाऊ लागले आहे. आडवाणी यांचे तिकीट कापण्यामागच्या अनेक ज्ञात अज्ञात कहाण्या सांगितल्या जात आहेत. या अनेक कहाण्यांपैकी ही एक कहाणी.

लालकृष्ण अडवाणी यांना बाजूला करणे इतके सोपे नव्हते

पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह हे प्रदीर्घ काळापासून गांधीनगर मतदारसंघातून उमेदवार बदलू इच्छित होते. दस्तुरखुद्द अमित शाह हे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतू, भारतीय जनता पक्ष संस्थापक असलेले आणि भारतीय राजकारणात आजच्या घडीला सर्वात ज्येष्ठ असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना बाजूला करणे इतके सोपे नव्हते. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमे म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा अप्रत्यक्षरित्या संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अनेकदा अडवाणी यांच्यासोबत चर्चेतही हा मुद्दा घेतला. परंतु, आडवाणी यांनी आपल्या उमेदवारीबाबत जाहीरपणे कधीच मतप्रदर्शन केले नाही.

ऑपरेशन बालाकोटने भाजप नेतृत्वास नवा आत्मविश्वास दिला

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, दिल्ली येथील रामलीला मैदानात भरलेल्या राष्ट्रीय अधिवेशनापर्यंत पक्षनेतृत्व हे साहस दाखवू शकले नाही. 75 वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या नेत्याला पक्ष तिकीट द्यायचे नाही. या धोरणातही लालकृष्ण अडवाणी हेच सर्वात मोठा अडथळा होते. मात्र, ऑपरेशन बालाकोटने भाजप नेतृत्व आणि पंतप्रधानांना एक नवा आत्मविश्वास दिला. (हेही वाचा, Lok Sabha Election 2019: भाजप VVIP उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ; नरेंद्र मोदी, अमित शाह रिंगणात)

आडवाणींकडून घराणेशाहीला विरोध

पक्षनेतृत्वाने गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आडवाणी यांच्या कन्येला उमेदवारी देण्याबाबत लालकृष्ण आडवाणी यांच्याकडे विचारणा केली. परंतु, आयुष्यभर घराणेशाहीला विरोध केलेल्या आडवाणी यांनी गांधीनगर मतदारसंघातून कन्येला उमेदवारी देण्यास विरोध केला. त्यानंतर पक्षातील मंडळींचा एकूणच होरा पाहून आडवाणी यांनी स्वत: निवडणूक न लडविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजप पक्षनेतृत्वाने लगेचच गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला. आता भाजप अध्यक्ष अमित शाह हे या मतदारसंगातून निवडणूक लढवणार आहेत.