Lok Sabha Elections 2019 साठी राजकीय पक्षांच्या फेसबुकवर 10 कोटींच्या जाहिराती; भाजप पक्षाकडून जाहिरातींवर सर्वाधिक खर्च

सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी विविध पद्धतींचा, माध्यमांचा वापर करत आहेत.

Facebook (Photo Credits: Facebook Pixabay)

देशात लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी विविध पद्धतींचा, माध्यमांचा वापर करत आहेत. सध्या सोशल मीडियाचा वापर वाढल्याने प्रचारासाठी राजकीय पक्ष फेसबुक (Facebook), ट्विटरसारख्या (Twitter) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर भर देत आहेत. यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात राजकीय पक्षांनी सोशल मीडियावर जाहिरात करण्यासाठी तब्बल 10 कोटी रुपये खर्च केले आहेत.

फेसबुकच्या अॅड लायब्ररी रिपोर्टनुसार, फेसबुकवर तब्बल 51,810 राजकीय जाहिराती देण्यात आल्या आहेत. यासाठी सुमारे 10.32 कोटींचा खर्च फेब्रुवारी-मार्च या दोन महिन्यात करण्यात आल्या आहेत. यात भाजप पक्ष आणि त्यांच्या समर्थकांनी सर्वाधिक खर्च केल्याचे समोर आले आहे.

भाजप पक्षाकडून झालेला खर्च:

गेल्या आठवड्यापर्यंत म्हणजे 23 मार्चपर्यंत राजकीय पक्षांच्या सुमारे 41,974 जाहिराती देण्यात आल्या. त्यासाठी सुमारे 8.58 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या जाहिराती राजकीय आणि देशातील समस्यांना महत्त्व देणाऱ्या असल्याचे फेसबुककडून सांगण्यात आले आहे.

सत्तेत असलेला भाजप पक्ष आणि समर्थकांनी भारत के 'मन की बात' या फेसबुक पेजवर सुमारे 3700 जाहिराती दिल्या असून त्यासाठी सुमारे 2.23 कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. याशिवाय 'माय फर्स्ट वोट फॉर मोदी' आणि 'नेशन विथ नमो' यांसारख्या फेसबुक पेजवर भाजपने 1,100 जाहिराती दिल्या असून त्याासाठी 36.2 लाखांचा खर्च करण्यात आला आहे.

काँग्रेस आणि इतर पक्षांनी केलेला खर्च:

काँग्रेस पक्षाने 410 जाहिरातींवर 5.91 लाखांचा खर्च गेल्या दोन महिन्यात केला आहे. त्याचबरोबर बीजू जनता दल यांनी 8.56 लाख, तेलगू देसम पार्टीने 1.58 लाख आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 58,355 रुपये जाहिरांसाठी खर्च केले आहेत.

राजकीय जाहिरातींची प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याचे फेसबुक, ट्विटर, गुगल यांनी यापूर्वीच जाहिर केले होते. तसंच गैरमार्गाने प्रभाव टाकण्याचा प्रयत्न समाजमाध्यमांनी करु नये, असे यंदा सरकारचे धोरण होते.