माजी आमदार निर्वेंद्र कुमार मिश्रा यांची जमावाकडून हत्या, मुलगा गंभीर जखमी; उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर येथील घटना
निर्वेंद्र कुमार मिश्रा हे निघासन विधानसभा मतदारसंघातून 1989 आणि 1991 मध्ये अपक्ष म्हणून तर 1993 मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते.
माजी आमदार निर्वेंद्र कुमार मिश्रा (Former MLA Nirvedra Kumar Mishra) यांची जमावाने लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत निर्वेंद्र कुमार मिश्रा (Nirvedra Kumar Mishra) यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील लखीमपूर (Lakhimpur) खीरी परिसात ही घटना रिवावारी घडली. प्राप्त माहितीनुसार बस स्टेशन परिसरात असलेल्या एका वादग्रस्त जमीनीवरील हक्काच्या वादातून ही घटना घडली. या जमिनीबाबतचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एक समूह या जमीनिचा कब्जा मिळविण्यासाठी जबरदस्तीने या जमनीवर घुसला. या समूहाला माजी आमदार निर्वेंद्र कुमार आणि त्यांचा मुलगा संजीव कुमार मिश्रा यांनी विरोध केला. या वेळी आक्रमक जमावाने लाठ्याकाठ्यांनी या पितापूत्राला मारहाण केली. या घटनेनंतर लाखिमपूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरु केली आहेत.
जमावाच्या मारहाणीत माजी आमदार निर्वेंद्र कुमार मिश्रा गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तर, त्यांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. माजी आमदारांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, घटना घडली तेव्हा मोठ्या संख्येने असलेला हत्यारबंद जमाव जमीनीचा कब्जा घेण्यासाठी आला होता. या जमावाला पिता-पूत्रांनी विरोध केला असता जमावाने शिवीगाळ करत दोघांना मारहाण केली.
निर्वेंद्र कुमार मिश्रा हे निघासन विधानसभा मतदारसंघातून 1989 आणि 1991 मध्ये अपक्ष म्हणून तर 1993 मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. (हेही वाचा, मुंबई: चोर समजून पालघर येथे 3 जणांची जमावाकडून हत्या)
या प्रकरणानंतर राजकीय प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे की, उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा आणखी एका ब्राह्मण हत्या झाली. उत्तर प्रदेशमधील जंगलराज पुन्हा एकदा भयावह रुप धारण करत आहे.
समाजवादी पक्षाने ही घटना अत्यंत भयावह आणि हृदयद्रावक असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात राज्य सरकारने स्पष्टीकरण देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.