दिल्ली: NDA बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहणार हजर; आदित्य ठाकरे, सुभाष देसाई यांच्या उपस्थितीची चर्चा

मात्र, संजय राऊत यांच्या ऐवजी सुभाष देसाई हे या सभेला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे इतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credit: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)ची बैठक राजधानी दिल्लीत पार पडत आहे. या बैठकीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena) हेसुद्धा उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि सुभाष देसाई हेसुद्धा उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे हे विदेश दौऱ्यावर असल्यामुळे या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त होते. मात्र, उद्धव ठाकरे मुंबईत दाखल झाल्याने ते या बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे समजते.

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) प्रक्रिया पार पडली. त्यानंतर एक्झिट पोल्सनीही आपापले अंदाजव वर्तवले. या अंदाजानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) यांच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमिवर भाजप प्रणीत NDA (एनडीए) ची आपल्या घटक पक्षांची एक बैठक पार पडत आहे.

दरम्यान, 2019 मध्ये आगामी पाच वर्षांच्या केंद्रातील सत्तास्थापनेसाठी रणनिती ठरत असताना. त्यातही एक्झिट पोल्सचे अंदाज एनडीएच्या बाजूने असताना शिवसेनेचे पर्यायाने उद्धव ठाकरे यांचे एनडीएचा घटक पक्ष म्हणून उपस्थित न राहणे हे राजकीय दृष्ट्या योग्य ठरणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे या बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

दरम्यान, शिवसेना प्रतिनिधी म्हणून उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी प्रतिनिधी म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत हे उपस्थित राहतील अशी चर्चा होती. मात्र, संजय राऊत यांच्या ऐवजी सुभाष देसाई हे या सभेला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे इतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. (हेही वाचा, एनडीएच्या बैठकीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहणार अनुपस्थित, संजय राऊत यांना दूर ठेवत सुभाष देसाई लावणार हजेरी?)

दरम्यान, एनडीएच्या या बैठकीस बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार हे उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त होते. मात्र, ताज्या माहितीनुसार नितीश कुमार हे या बैठकीस उपस्थितत राहणार असल्याचे समजते.

भाजपच्या दिल्ली कार्यालयात सायंकाळी 7 वाजता भाजप आणि एनडीएतील सर्व घटक पक्ष आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह हे या बैठकीचे नेतृत्व करतील. तत्पूर्वी दुपारी 4 वाजता भाजप नेत्यांची बैठक पार पडणार आहे.