कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला

केवळ एकाच कुटुंबाला नोटबंदीमुळे फार दुख: झाले आहे, असा टोलाही मोदींनी काँग्रेस आणि गांधी परिवाराला लगावाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (File Photo, Photo Credit -Twitter BJP)

दरबारातील लोक केवळ एकाच घराण्याचे गीत गातात. मी आव्हान देतो की, घराण्याबाहेरच्या नेत्याला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवावे. असे घडल्यास पंडीत नेहरूंनी व्याप्त दृष्टीने लोकशाही व्यवस्था निर्माण केली होती असे मी मानेन, अशी टीका पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर गांधी घराण्याचा नामोल्लेख टाळत केली. छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रसाचारादरम्यान आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. या वेळी मोदी यांनी नक्षली हल्ल्याचे सावट असतानाही मोठ्या प्रमाणावर जनतेने मतदान केले, त्याबाबत आभारही मानले. लोकांकडून मतदानास मिळालेला प्रतिसाद म्हणजे नक्षलवादाला दिलेले उत्तरच असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. तसेच, दुसऱ्या टप्प्यात अशाच प्रकारे मतदानात सहभाग घ्या असे अवाहनही त्यांनी जनतेला केले.

या वेळी विरोधकांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, विरोधकांना आजूनही विश्वास बसत नाही की, एक चाहावाला कसा काय पंतप्रधान झाला? चहावाला पंतप्रधान कसा काय बनू शकतो? आता तर ते सांगत आहेत की, एक चहावाला एका महान व्यक्तीमुळेच पंतप्रधान झाला. पण, मी आव्हान देऊ इच्छितो की, एका घराण्याबाहेरच्या एखाद्या चांगल्याने नेत्याला पाच वर्षांहून अधीक काळासाठी पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवावे. मग मी मानेन की खरोखरच पं. नेहरुंनी व्याप्त स्वरुपात लोकशाही निर्माण केली. काँग्रेस नेते शशी थरुर यांनी नुकतेच एक वक्तव्य केले होते. त्यात पंडित नेहरुंमुळेच मोदी पंतप्रधान होऊ शकल्याचे ते म्हणाले होते. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात थरुर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. (हेही वाचा, भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवराज सिंह चौहाण यांची कोंडी?)

पंतप्रधान मोदींनी पुढे बोलताना सांगीतले की, काँग्रेस पक्षाला झोपही लागत नाही की, आमच्या कुटुंबाला वारशाप्रमाणे मिळालेली सत्तेची खुर्ची चाहावाल्याने पळवलीच कशी? दरम्यान, मोदी यांनी नोटबंदीवरुनही भाष्य केले. ते म्हणाले, इथे उपस्थित असलेला एकही व्यक्ती आज नोटबंदीमुळे रडत नाही. केवळ एकाच कुटुंबाला नोटबंदीमुळे फार दुख: झाले आहे, असा टोलाही मोदींनी काँग्रेस आणि गांधी परिवाराला लगावाला.