मध्य प्रदेश मध्ये 'कमलनाथ सरकार' धोक्यात; 6 बंडखोर मंत्र्यांना हटवले एकूण 19 आमदारांनी पाठवला राजीनामा

यामध्ये इमरती देवी, तुलसी सिलावट, गोविंद सिंह राजपूत, महेंद्र सिंह सिसोदिया, प्रद्युमन सिंह तोमर आणि डॉ. प्रभुराम चौधरी यांचा समावेश आहे.

Kamalnath Sarkar (Photo Credit-ANI)

मध्यप्रदेशात आज धुलिवंदनाच्या दिवशी राजकीय धूळवड पहायला मिळाली. दरम्यान कॉंग्रेसच्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर सिंधिया समर्थक 19 आमदारांनीदेखील राजीनामा विधासभेच्या सभापतींकडे पाठवल्याने कमलनाथ सरकार धोक्यामध्ये आले आहे. दरम्यान कमलनाथ यांनी 6 बंडखोरी करणार्‍या मंत्र्यांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये इमरती देवी, तुलसी सिलावट, गोविंद सिंह राजपूत, महेंद्र सिंह सिसोदिया, प्रद्युमन सिंह तोमर आणि डॉ. प्रभुराम चौधरी यांचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून नाराज ज्योतिरादित्य सिंधिया यांना मनवण्यात अपयशी ठरलेल्या कॉंग्रेसला आज मध्य प्रदेशात मोठा फटका बसला आहे. आमदारांच्या राजीनाम्यामुळे आज(10 मार्च) कमलनाथ सरकार धोक्यामध्ये आले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्याने मध्य प्रदेशात कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का; भाजपा मध्ये प्रवेश करणार?

मध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. त्यापैकी 114 जागांसह काँग्रेस सत्तेत आहे तर भाजपाच्या 107 जागा आहे. दरम्यान सिंधिया यांच्या या राजकीय खेळीला कॉंग्रेस पक्षाकडून 'गद्दारी' केल्याचं सांगण्यात आले आहे. आता मध्य प्रदेशात आमचं सरकार वाचवणं कठीण असल्याची भावना कॉंग्रेस पक्षाचे संघटन महासचिव के सी वेणूगोपाल यांनी म्हटलं आहे. दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांना तात्काळ पक्षातून काढण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.  मध्यप्रदेश: ऑपरेशन लोटसला धक्का; मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतले 16 मंत्र्यांचे राजीनामे

काल रात्रीपासून मध्य प्रदेशात राजकीय उलटापालट सुरू आहे. आज सकाळी ज्योतिरादित्य यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर ट्वीटच्या माध्यमातून एक पत्र पोस्ट करत आपण कॉंग्रेस पक्षाला अलविदा म्हणत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता ज्योतिरादित्य सिंधिया भाजपामध्ये प्रवेश करतात का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.