पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं - राहुल गांधी

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलंय,' असा आरोप राहुल गांधी यांनी आज आपल्या ट्विटर हँडलवरून केला आहे.

Rahul Gandhi (PC - PTI)

भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था, घसरलेला विकास दर, एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे मोदी सरकारवर विरोधकांकडून वारंवार टीका होत आहे. सध्या संपूर्ण देशात सुधारित नागरिकत्व विधेयकावरून वादंग सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक विद्यार्थी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 'मोदी सरकार रोजगाराच्या प्रश्नांमुळे तरुणांच्या रागाचा सामना करू शकत नाही. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलंय,' असा आरोप राहुल गांधी यांनी आज आपल्या ट्विटर हँडलवरून केला आहे. (हेही वाचा - CAA Protest: सुधारित नागरिकत्व या काळ्या कायद्याला विरोध असणाऱ्यांनी आपल्या घराबाहेर तिरंगा फडकावा - असदुद्दीन ओवैसी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे. अर्थव्यवस्थेला पोहोचवलेली हानी आणि घटलेल्या रोजगारामुळे मोदी सरकार तरुणांच्या रागाला सामोरे जाऊ शकत नाही. त्यामुळे ते भारतामध्ये फूट पाडून द्वेष लपवत आहेत. आपण प्रत्येक भारतीयाविषयी प्रेम व्यक्त करून त्यांचा पराभव करू शकतो, असंही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मागील काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांनी देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. मानवनिर्मित संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या सर्व परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार आहे,' असं मनमोहनसिंग यांनी म्हटलं होतं. तसेच माजी मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमण्यम यांनी भारतीय अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये असल्याचं म्हणत चिंता व्यक्त केली आहे.