Delhi-Mumbai Expressway: पंतप्रधान मोदींनी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे केलं उद्घाटन; म्हणाले, हे विकसित भारताचं चित्र आहे

या महामार्गामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि मुंबई दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवेल.

PM Modi inaugurates first phase of Delhi-Mumbai Expressway (PC -ANI)

Delhi-Mumbai Expressway: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी रविवारी बहुप्रतिक्षित दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या (Delhi-Mumbai Expressway) पहिल्या भागाचे उद्घाटन केले. 1,386 किलोमीटर द्रुतगती मार्गाचा पहिला विभाग 246 किमी लांबीचा आहे. दिल्ली-दौसा-लालसोट दरम्यानचा हा विभाग दिल्ली ते जयपूर प्रवास सुलभ करेल. त्याच्या बांधकामानंतर दिल्ली ते जयपूर हा पाच तासांचा प्रवास अवघ्या साडेतीन तासांत पूर्ण होणार आहे.

हा एक्स्प्रेस वे पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई प्रवासाचा वेळ 24 तासांवरून 12 तासांवर येईल. याशिवाय द्रुतगती मार्गांदरम्यान येणाऱ्या शहरांमधील अंतरही सोपे होणार आहे. दौसा येथून एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमाला संबोधित केले. पीएम मोदी म्हणाले की, गेल्या 9 वर्षांपासून आम्ही पायाभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक करत आहोत. या गुंतवणुकीचा मोठा फायदा राजस्थानला होणार आहे. (हेही वाचा - Delhi-Mumbai Expressway Night View: नितिन गडकरी यांनी शेअर केला दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेचा नाइट व्यू; आनंद महिंद्रा म्हणाले, ही जादू आहे)

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचा पहिला टप्पा देशाला समर्पित करताना आज मला खूप अभिमान वाटत आहे. हा देशातील सर्वात मोठा आणि आधुनिक द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. हे विकसित भारताचे आणखी एक भव्य चित्र आहे. मी दौसा येथील रहिवाशांचे आणि देशवासियांचे अभिनंदन करतो. यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम 2014 मध्ये तरतूद केलेल्या रकमेच्या पाचपट आहे. या गुंतवणुकीचा राजस्थानला खूप फायदा होणार आहे.

पंतप्रधानांनी दौसामध्ये 18,100 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही केले. ते म्हणाले की, जेव्हा असे आधुनिक रस्ते, आधुनिक रेल्वे स्थानके, रेल्वे ट्रॅक, मेट्रो आणि विमानतळ बांधले जातात, तेव्हा देशाच्या प्रगतीला गती मिळते. त्यामुळे केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर सातत्याने मोठी गुंतवणूक करत आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हे राजस्थान आणि देशाच्या प्रगतीचे दोन मजबूत स्तंभ बनणार आहेत. या प्रकल्पांमुळे आगामी काळात राजस्थानसह संपूर्ण प्रदेशाचे चित्र बदलणार आहे. या आधुनिक कनेक्टिव्हिटीचा फायदा सरिस्का व्याघ्र प्रकल्प, केवलदेव आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, जयपूर, अजमेर यासारख्या अनेक पर्यटन स्थळांना होईल, असंही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, 9 मार्च 2019 रोजी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाची पायाभरणी करण्यात आली. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा 246 किमीचा दिल्ली-दौसा-लालसोट विभाग 12,150 कोटी रुपये खर्चून बांधला गेला आहे. हा विभाग सुरू झाल्यामुळे दिल्ली ते जयपूर प्रवासाचा वेळ 5 तासांवरून 3.5 तासांवर येईल. याशिवाय संपूर्ण क्षेत्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळाल्याचा दावाही सरकारने केला आहे. 1,386 किलोमीटर लांबीचा एक्स्प्रेस वे 98,000 कोटी रुपये खर्चून विकसित केला जात आहे.

काय आहे या एक्स्प्रेस वे ची खासियत?

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग असेल. या महामार्गामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि मुंबई दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवेल. एक्सप्रेसवे 93 PM गती शक्ती टर्मिनल, 13 बंदरे, आठ प्रमुख विमानतळ आणि आठ मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क (MMLPs) तसेच जेवार विमानतळ, नवी मुंबई विमानतळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट यांसारख्या आगामी ग्रीनफिल्ड विमानतळांना जोडेल. याशिवाय दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांतून जाणारा हा एक्स्प्रेस वे जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद या आर्थिक केंद्रांमधून जाणार आहे.