IPL Auction 2025 Live

Poonch Terrorist Attack: पुंछ दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे कनेक्शन उघड, 6 जणांना घेण्यात आलं ताब्यात

एनआयएनेही घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले आहेत. दुसरीकडे, हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी एका वाहनातून घटनास्थळावरून पळून गेल्याचा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे.

Poonch Terrorist Attack (PC - Twitter)

Poonch Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमधील पूंछ (Poonch) मध्ये गुरुवारी लष्करी वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात  (Terrorist Attack) पाकिस्तानचा कट उघड झाला आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या 3 दहशतवाद्यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा संशय आहे. या हल्ल्याची जबाबदारी जैश समर्थित दहशतवादी संघटना पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) ने घेतली आहे.

पूंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना ताब्यात घेतले आहे. एनआयएनेही घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले आहेत. दुसरीकडे, हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी एका वाहनातून घटनास्थळावरून पळून गेल्याचा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. या हल्ल्यात चार ते पाच दहशतवादी सहभागी असल्याची शक्यता एजन्सींनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा - Terrorist Will Pay Hard: लष्करावरील हल्ल्यानंतर बाटा-दोरिया भागातील जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरु)

जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकल्यानंतर लष्कराच्या वाहनाला आग लागल्याने पाच जवान शहीद झाले तर अन्य एक गंभीर जखमी झाला. यामध्ये शहीद झालेले जवान हे राष्ट्रीय रायफल्स युनिटचे होते आणि ते या भागात दहशतवादविरोधी कारवायांसाठी तैनात होते.

लष्कराने सांगितले होते की, लष्कराचे वाहन राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछ दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास जात होते आणि त्याचवेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. सूत्रांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी वाहनावर गोळ्यांच्या खुणा पाहिल्या आहेत आणि तेथून ग्रेनेडचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत, ज्याने हा दहशतवादी हल्ला असल्याची पुष्टी केली आहे. दरम्यान, आज जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. यावेळी लष्करातील वरिष्ठ अधिकारी व अधिकारी उपस्थित होते.