Nipah Virus In Kerala: केरळमध्ये आणखी एका व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण, देशातील एकूण रुग्णांची संख्या पोहोचली 5 वर; अलर्ट जारी
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या, एनआयव्ही पुण्यातील एक टीम आज संध्याकाळपर्यंत कोझिकोडला मोबाइल लॅब स्थापन करण्यासाठी पोहोचेल.
Nipah Virus In Kerala: केरळमधील कोझिकोड (Kozhikode) जिल्ह्यात निपाह व्हायरस (Nipah Virus) च्या आणखी एका प्रकरणाची पुष्टी झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज (Veena George) यांनी बुधवारी सांगितले की, एका खासगी रुग्णालयातील 24 वर्षीय आरोग्य सेविकेला निपाह व्हायरसची लागण झाली. त्यामुळे केरळमध्ये निपाह व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या पाच झाली आहे.
दरम्यान, कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसचा धोका वाढल्यानंतर राज्य सरकारने आरोग्यविषयक अलर्ट जारी केला आहे. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना कोझिकोड येथे पाठवण्यात आले आहे. प्रोटोकॉलच्या आधारे 16 समित्याही स्थापन करण्यात आल्या असून कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये 75 खोल्याही तयार करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा - Fake Liver Drug: सावध रहा! भारतात विकले जात आहे बनावट लिव्हर औषध; WHO ने जारी केला इशारा)
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोझिकोड जिल्ह्यातील दोन केंद्रे आणि त्यांच्या सभोवतालच्या पाच किलोमीटरच्या परिघात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या, 'एनआयव्ही पुण्यातील एक टीम आज संध्याकाळपर्यंत कोझिकोडला मोबाइल लॅब स्थापन करण्यासाठी पोहोचेल. एनआयव्ही पुणे येथून आणखी एक पथक व्हायरसचे सर्वेक्षण करण्यासाठी येणार आहे. सर्वेक्षणासाठी चेन्नईहून साथीच्या आजारावरील तज्ज्ञही येणार आहेत.
जॉर्ज यांनी पुढे सांगितले की, हा विषाणू टाळण्यासाठी आरोग्य विभागाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. या विषाणूपासून जास्तीत जास्त लोकांना वाचवणे आणि उपचार देणे हेच सध्या आरोग्य विभागाचे प्राधान्य आहे. निपाह व्हायरसमुळे राज्यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एकाच्या कुटुंबीयांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या विषाणूची लागण झालेल्या पहिल्या व्यक्तीचा 30 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. सुरुवातीला, त्याच्या मृत्यूचे कारण यकृत सिरोसिस असल्याचे सांगितले जात होते, परंतु नंतर कुटुंबातील सदस्य, त्याचा नऊ वर्षांचा मुलगा आणि 24 वर्षांचा नातेवाईक, मंगळवारी निपाह विषाणूच्या संसर्गासाठी पॉझिटिव्ह आले. त्यांचा मुलगा सध्या आयसीयूमध्ये दाखल आहे.