Lockdown In India: भारतात लॉकडाऊनची गरज नाही; देशात कोरोनाबाबत वाढलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचा दावा
परंतु काही देशांमध्ये वाढती प्रकरणे पाहता कडक देखरेख आणि सतर्कतेची गरज आहे.
Lockdown In India: कोरोना व्हायरस (Coronavirus) पुन्हा एकदा जगभरात झपाट्याने पसरत आहे. भारतातही याबाबत चिंता वाढत आहे. दरम्यान, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतातील कोविडच्या सध्याच्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर (International Flights) बंदी घालण्याची किंवा लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्याची गरज नाही. परंतु काही देशांमध्ये वाढती प्रकरणे पाहता कडक देखरेख आणि सतर्कतेची गरज आहे. नव्याने पसरणाऱ्या कोरोनाचा प्रभाव जास्त नाही. परिणामी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता नाही. भारतातील लोकांना 'हायब्रीड इम्युनिटी' (Hybrid Immunity) म्हणजेचं लसीकरणाचा फायदा नक्कीच मिळेल.
एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी शुक्रवारी सांगितले, "एकंदरीत, कोविड प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही आणि भारत सध्या चांगल्या स्थितीत आहे. सध्याच्या परिस्थितीत, आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याची किंवा लॉकडाऊन लादण्याची गरज नाही. भूतकाळातील अनुभव असे दर्शवतात की, संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी फ्लाइट्सवर बंदी घालणे प्रभावी नाही. याशिवाय, चीनमध्ये झपाट्याने पसरत असलेला ओमिक्रॉन उप-प्रकार BF7, आपल्या देशात आधीच आढळून आला आहे. (हेही वाचा -Covid-19 In India: चीनसह 'या' पाच देशांतील प्रवाशांची करण्यात येणार RT-PCR चाचणी; संक्रमित आढळल्यास राहावे लागणार क्वारंटाईन)
लसीकरणाचा फायदा होणार -
येत्या काही दिवसांत लॉकडाऊनची गरज भासू शकते का असे विचारले असता, डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं की, "या कोविडमुळे रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता नाही. कारण, बहुतेक भारतीय लोकांमध्ये लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊनची गरज नाही.
काळजी घेणे आवश्यक -
त्याचवेळी सफदरजंग हॉस्पिटलमधील पल्मोनरी, क्रिटिकल केअर आणि स्लीप मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज गुप्ता म्हणाले की, चीन आणि इतर काही देशांमध्ये कोविडची वाढती प्रकरणे पाहता भारताने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. परंतु भारतातील परिस्थिती पाहता यावेळी लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवणार नाही, असे वाटते. मात्र, कोविडबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. जागतिक परिस्थितीकडे पाहून आपण आत्मसंतुष्ट होऊ शकत नाही. कारण महामारी अजूनही संपलेली नाही.
कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक -
त्याचवेळी, लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे (NTAGI) अध्यक्ष डॉ. एनके अरोरा म्हणाले की, सध्या भारतात कोविडची परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. तथापि, कोविड टाळण्यासाठी लोकांनी नियमांचे पालन केले पाहिजे.
दरम्यान, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझील, फ्रान्स आणि चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. दरम्यान, भारतात परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. सध्या, चिनी शहरे ओमिक्रॉन स्ट्रेन, BF7 विषाणूने प्रभावित आहेत. बीजिंगमध्ये त्याचा विशेष प्रभाव दिसून येत आहे. BF7 हे Omicron च्या BA.5 व्हेरियंटचे उप-व्हेरियंट आहे.