Yes Bank खातेदारांसाठी खुशखबर! बँकेवरील निर्बंध 18 मार्च रोजी हटणार
मात्र खातेदारांची चिंता कमी करणारी बातमी समोर येत आहे.
रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) येस बँकेवर (Yes Bank) निर्बंध घातल्यानंतर खातेदार अत्यंत चिंतेत होते. मात्र खातेदारांची चिंता कमी करणारी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला (Yes Bank Ltd Reconstruction Scheme 2020) अधिसूचित केले आहे. त्यानुसार आर्थिक संकटात अडकलेल्या येस बँकेवरील निर्बंध 18 मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता हटवण्यात येतील. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी 'येस बँक लिमिटेड पुनर्निर्माण योजना 2020' अधिसूचित केली आहे. त्यानुसार येस बँकेवरील निर्बंध तीन दिवसात हटवण्यात येतील. तसंच येस बँकेचा कार्यभार सांभाळण्यासाठी एक नवीन संचालन बोर्डाची स्थापना करण्यात येईल. यात स्टेट बँक ऑफ इंडियाचे कमीत कमी 2 डायरेक्टर्स असतील. हे नवे बोर्ड काही दिवसातच कार्यरत होईल.
आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेवर आरबीआयने 5 मार्च ते 3 एप्रिल या काळासाठी निर्बंध घातले होते. त्यानुसार महिनाभरात खातेदारांना खात्यातून केवळ 50000 रुपये काढता येणार होते. मात्र बँकेवरील आर्थिक संकट लवकरच दूर होणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. (एटीएम नंतर आता IMPS, NEFT सेवा सुरु; येस बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा)
ANI Tweet:
आर्थिक संकटात अडकलेल्या येस बँकेला सावरण्यासाठी आयसीआयसी बँक, एक्सिस बँक, एडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक यांनी येस बँकेत एकूण 3,100 कोटी रुपये गुंतवण्याचे जाहीर केले आहे. तसंच स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकेत एकूण 7,250 कोटी रुपये गुंतवणार असून एसबीआयकडे बँकेची 49% भागीदारी राहील.
रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यानंतर नेट बँकिंग, मोबाईल अॅप, डेबिट-क्रेडीट कार्ड, चेक क्लिअरिंग आणि ATM या सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. तसंच मोबाईल, इंटरनेट बँकींग या सेवाही बंद होत्या. गुगलपे, फोनपे यांसारख्या मोबाईल वॉलेट्स मधूनही येस बँकेच्या खातेदारांना आर्थिक व्यवहार करता येत नव्हते. मात्र हळूहळू एक-एक सुविधा पूर्ववत करण्यात आल्या.