IPL Auction 2025 Live

Work From Home: ऑफिसला जाण्याऐवजी घरून काम करण्यास प्राधान्य; 82 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात यायचे नाही- Report

ज्या कंपन्या या नव्या प्रणालीचा अवलंब करण्यास तयार नाहीत त्यांना चांगले कर्मचारी नियुक्त करणे आणि आधीपासून कार्यरत असलेल्या चांगल्या लोकांना टिकवून ठेवण्यासाठी आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pexels)

जागतिक महामारी कोविड-19 मुळे कामकाजाच्या जीवनात झालेल्या अभूतपूर्व बदलांच्या दरम्यान, आता लोक ऑफिसला जाण्याऐवजी घरून काम करण्याला (Work From Hnome) प्राधान्य देत असल्याचे एका अभ्यासातून दिसून आले आहे. रोजगाराशी संबंधित वेबसाईट सायकीच्या 'टेक टॅलेंट आउटलुक' अहवालानुसार, महामारीमुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांवर घरून काम करण्याची प्रणाली लादण्यात आली होती, परंतु आता दोन वर्षानंतर 'घरातून काम' हा आता 'नवा ट्रेंड' बनला आहे. आणि या नवीन सवयींनी लोकांच्या जीवनात स्थान निर्माण केले आहे. या अभ्यासातील लोकांपैकी 82 टक्के लोकांना ऑफिसला जायचे नाही आणि घरून काम करायचे आहे.

टॅलेंट टेक आउटलुक 2022 मध्ये चार खंडांमधील 100 हून अधिक अधिकारी आणि मानव संसाधन (HR) अधिकारी यांच्या प्रतिसादांचे विश्लेषण केले आहे. सोशल मीडिया, प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन घेतलेल्या मुलाखती आणि पॅनल डिस्कशनच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले. अभ्यासात सहभागी असलेल्या 64 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, घरून काम केल्याने त्यांची उत्पादकता वाढते आणि तणाव कमी होतो.

महत्वाचे म्हणजे आता नवीन नोकरीमध्येही कर्मचारी घरून काम करण्याला प्राधान्य देत आहेत. यामध्ये 80 टक्क्यांहून अधिक एचआर व्यवस्थापकांनी सांगितले की त्यांच्यासाठी पूर्णवेळ कार्यालयात येणारे कर्मचारी शोधणे कठीण होत आहे. त्याच वेळी, 67 टक्क्यांहून अधिक कंपन्यांनीदेखील म्हटले की त्यांना ऑफिसमध्ये काम करणारे लोक शोधणे कठीण होत आहे. यामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची घरून काम करण्यास परवानगी देण्याची त्यांच्या मालकाकडून अपेक्षा आहे. (हेही वाचा: आतापर्यंत देशातील जवळपास 4.5 कोटी मुलांनी कोविड लस घेतली - पंतप्रधान नरेंद्र मोदी)

ज्या कंपन्या या नव्या प्रणालीचा अवलंब करण्यास तयार नाहीत त्यांना चांगले कर्मचारी नियुक्त करणे आणि आधीपासून कार्यरत असलेल्या चांगल्या लोकांना टिकवून ठेवण्यासाठी आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अभ्यासात म्हटले आहे की, दोन वर्षांच्या रिमोट कामानंतर, एक नवीन प्रकारची लवचिकता आढळली आहे जी कर्मचारी आणि नियोक्ता दोघांसाठी फायदेशीर आहे.