घरातून पळून गेलेल्या 718 मुलांना पश्चिम रेल्वेने केले त्यांच्या कुटूंबियांकडे सुपूर्त

घरातून पळून गेलेल्या 718 मुलांना पश्चिम रेल्वे सुरक्षा बल(RPF) च्या राज्य पोलीस, गुप्तहेर संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कुटूंबियांच्या हवाली केले आहे

Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

पश्चिम रेल्वे पोलिसांनी(Western Railway Police)  एक महत्त्वपुर्ण अशी कामगिरी बजावली आहे. काही कारणास्तवर घरातून पळून गेलेल्या 718 मुलांना पश्चिम रेल्वे सुरक्षा बल(RPF) च्या राज्य पोलीस, गुप्तहेर संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने  कुटूंबियांच्या हवाली केले आहे. ह्यात  मार्च 2018 ते मार्च 2019 पर्यंत घरापासून दुरावलेल्या 718 मुलांचा समावेश आहे. या संपुर्ण कामगिरीत पश्चिम रेल्वेच्या चाइल्ड हेल्पलाईनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर म्हणाले, घर सोडून गेलेली मुले ब-याचदा तस्करीला बळी पडतात. त्यात त्यांना भीक मागण्यास प्रवृत्त करणे, चो-या-मा-या करायला लावणे यांसारख्या अनेक वाईट गोष्टी त्यांना कराव्या लागलात. त्यात बरीच मुले ही कुठल्या ना कुठल्या रेल्वेस्थानकातच भटकताना आढळतात. अशा ह्या मुलांना त्यांचे हक्काचे घर परत मिळावे म्हणून पश्चिम रेल्वे पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी फत्ते केली आहे.

ह्या पोलिसांच्या हाती लागलेल्या 718 मुलांपैकी मुंबई सेंट्रल भागातून 381, बडोदामधून 71, अहमदाबाद 44, रतलाम 174, राजकोट 23 आणि भावनगर भागातून 25 मुलांची सुटका केली आहे.

मुंबई, ठाण्यातील १९ स्थानकांचा होणार पुनर्विकास, MRVC देणार अत्यावश्यक सुविधांवर भर

ह्या संपूर्ण मोहिमेत चाइल्ड हेल्पलाईनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेद्वारा महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या मदतीने उपाययोजना करण्यात येत आहे. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, सुरत, बडोदा, अहमदाबाद, रतलाम आणि राजकोट स्थानकांवर चाइल्ड हेल्पलाइन डेस्कची स्थापना करण्यात आली आहे.