West Bengal: ममता बॅनर्जी पुन्हा रिंगणात, नंदीग्राम येथील पराभवानंतर भवानीपूर येथून 'पुनश्च हरीओम'
भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा पारंपरीक मतदारसंघ आहे. या आधी त्या गेली अनेक वर्षे येथून निवडून येत आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) पुन्हा एकदा आपल्या पारंपरीत मतदारसंघातून आपली राजकीय लढाई लढणार आहेत. विधानसभा निवणूक 2021 मध्ये नंदीग्राम (Nandigram) मतदारसंघातून त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता पुन्हा भवानीपूर (Bhawanipur) येथून लढणार आहेत. मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी विद्यमान आमदार शोभनदेब चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्या राजीनाम्यावर ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की 'मी त्यांना विचारले आहे की, ते स्वखुशीने राजीनामा देत आहेत की त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे? ते स्वखुशीने राजीनामा देत असल्याने आपण तो स्वीकारत आहे', असले ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी उमेदवारी अर्ज दाखल करुन आमदार म्हणून कायम राहण्याचा मार्ग मोकळा करु शकतात. भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा पारंपरीक मतदारसंघ आहे. या आधी त्या गेली अनेक वर्षे येथून निवडून येत आहेत. मात्र, या वेळी त्यांनी नंदीग्राम येथून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. नंदीग्राम येथून त्यांचा नीसटता पराभव झाला. तृणमूल काँग्रेसचे माजी नेते आणि ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय असलेल्या शुभेंदू अदिकारी यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. शुभेंदू अधिकारी यांनी निवडणुकीच्या काही काळ आगोदर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. (हेही वाचा, Mamata Banerjee Attacks PM After Meeting: पंतप्रधान मोदी यांच्या मीटिंगनंतर ममता बॅनर्जी भडकल्या; म्हणाल्या, आम्हाला बोलण्याची परवानगी दिली नाही)
ममता बॅनर्जी या राज्यघटनेनुसार मुख्यमंत्री झाल्या असल्या तरी, त्या विधानसभेच्या सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना येत्या सहा महिन्यात विधानसभा सदस्य होणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी आपली आमदारकी सोडण्याबत शोभनदेब चट्टोपाध्याय यांनी म्हटले की, मी आज भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. पक्षासोबत हा माझाही निर्णय आहे. मी माझ्या निर्णयावर समाधानी आहे.
दरम्यान, पक्षातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, शोभनदेव हे खऱदाह मददारसंघातून निवडणूक लढवू शकतात. तृणमूल काँग्रस पक्षाचे उमेदवार काजल सिन्हा यांचे निवडणुकीदरम्यान निधन झाले. त्यामुळे या ठिकाणी निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीत शोभन चट्टोपाध्याय हे खरदाह येथून निवडणूक लढू शकतात. शोभन चट्टोपाध्याय हे ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जातात.