North India Rain: उत्तर भारतात मुसळधार पाऊस, हिमाचल प्रदेशात अलर्ट जारी

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 8 ते 10 जुलै दरम्यान, पुढील पाच दिवस पंजाब, हरियाणा-चंडीगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

rain update- Photo credit- ANI

उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. देशाची राजधानी दिल्लीतही मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या पावसामुळं यंदाची अमरनाथ यात्रा देखील काल सलग दुसऱ्या दिवशी पाऊस आणि भूस्खलनामुळे पुढे ढकलावी लागली आहे. हवामान खात्याने हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे.  (हेही वाचा - Maharashtra Monsoon Update: मुसळधार पाऊस असला तरी शेतकऱ्यांची चिंता वाढणार, हवामान विभागाने वर्तवला सुधारीत अंदाज)

रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. भारतीय हवामान विभागाने  देशातील अनेक भागांमध्ये  मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील दोन दिवस उत्तराखंड, राजस्थान (पूर्व), जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीसह अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हिमाचलमध्ये राज्यात 13 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कांगडा, चंबा, शिमला, मंडी, कुल्लू, सिरमौर, सोलन आणि उना जिल्ह्यातील नद्यांना पूर येण्याच्या शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 8 ते 10 जुलै दरम्यान, पुढील पाच दिवस पंजाब, हरियाणा-चंडीगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि पाणी साचण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, आसाम आणि मेघालय, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूरमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. बिहारमध्ये 9 ते 12 जुलै दरम्यान, झारखंडमध्ये 11 ते 12 जुलै दरम्यान आणि अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये 8 ते 10 जुलै दरम्यान खराब हवामानाची शक्यता आहे.