Viral Video: मध्य प्रदेशातील महिलेचा 'पाण्यावर चालत' असतानाचा व्हिडिओ व्हायरल; देवी समजून होऊ लागली पूजा, जाणून घ्या सत्य
त्यानंतर जेव्हा ही महिला पाण्यातून बाहेर आली तेव्हा लोकांनी तिला देवी मानून तिची पूजा करायला सुरुवात केली. या महिलेमध्ये अद्भुत शक्ती असल्याची धारणा लोकांच्या मनात निर्माण झाली होती.
गेल्या तीन दिवसांपासून एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जबलपूरचा (Jabalpur) असून, यामध्ये एक वृद्ध महिला नर्मदा नदीच्या (Narmada River) पाण्यावर चालत असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला नर्मदा नदीच्या पाण्यावरून चालत आहे. त्यानंतर जेव्हा ही महिला पाण्यातून बाहेर आली तेव्हा लोकांनी तिला देवी मानून तिची पूजा करायला सुरुवात केली. या महिलेमध्ये अद्भुत शक्ती असल्याची धारणा लोकांच्या मनात निर्माण झाली होती.
परंतु आता स्वतः या महिलेने व्हिडिओचे सत्य सांगितले आहे. ज्योती रघुवंशी (51) असे या महिलेचे नाव असून, आपण देवी नाही तसेच आपल्यामध्ये कोणती शक्ती नाही असे महिलेने सांगितले आहे. नदीत त्या ठिकाणी पाणी कमी असल्याने आपण पाण्यातून चालत गेलो असे ती म्हणाली. आपण नर्मदा परिक्रमा यात्रा करत असल्याचे तिने सांगितले आहे. नर्मदेत स्नान करून ती बाहेर येत असताना काही लोकांनी तिचा हा व्हिडिओ बनवला होता.
नर्मदा नदीच्या पाण्यातून चालणारी वृद्ध महिला-
ज्योती रघुवंशी यांनी सांगितले की, ती खूप साधी व्यक्ती आहे. तिच्याकडे कोणतेही चमत्कारिक सामर्थ्य नाही. पाण्यावर चालण्याच्या अफवा चुकीच्या असल्याचे सांगून ती पुढे म्हणाली की, त्या ठिकाणी पाणी कमी होते त्यामुळे आपण नदीत चालू शकलो. नर्मदा परिक्रमा करताना गरज पडल्यास आपण पोहल्याचेही तिने सांगितले. (हेही वाचा: White Crow Viral Video: निसर्गाची किमया! पुण्यात आढळला पांढऱ्या रंगाचा कावळा, पहा व्हिडिओ)
हा व्हिडिओ तिलवाडा घाटावर शूट केल्याचा दावा करणारे वृत्तही खरे नाही. पोलिसांनी सांगितले की, हा व्हिडिओ अशा ठिकाणी काढण्यात आला आहे जिथे पाण्याची पातळी कमी होती. महिलेच्या कुटुंबीयांनीही ती देवी असल्याचे नाकारले आहे. महिलेचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले. एवढेच नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासून ही महिला घरातून बेपत्ता आहे व तिचे कुटुंबीय तिला शोधात असताना हा व्हिडिओ समोर आला आहे.