Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचार सुरुच, इंफाळमध्ये अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या
ईशान्येकडील राज्यातील मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मणिपूरच्या कांगपोकपी (Kangpokpi) येथे आणखी एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मृताचा मृतदेह राज्याच्या राजधानीत आणल्याने इंफाळमध्ये (Imphal) तणाव वाढला आहे. कर्फ्यूचे (Curfew) आदेश झुगारून आणि न्यायाची मागणी करत आंदोलक रस्त्यावर उतरले. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलीस आणि जलद कृती दलाच्या (RAF) जवानांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. (हेही वाचा - Rahul Gandhi Manipur Visit: राहुल गांधी पोहोचले मणिपूरात, रिलीफ कॅम्पमध्ये मुलांसोबत केले जेवण, पाहा VIDEO)
इम्फाळच्या खवैरनबंद बाजार येथे जमाव जमला होता जिथे कांगपोकपी जिल्ह्यात सकाळी झालेल्या गोळीबारात मारल्या गेलेल्या माणसाचा मृतदेह आणून शवपेटीमध्ये ठेवण्यात आला होता. निदर्शक जमले आणि एका जमावाने ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा नेण्याची धमकी दिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांना अटक करू नये म्हणून ते रस्त्याच्या मधोमध टायर जाळताना दिसले. “आरएएफ जवानांसह पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर त्यांनी मृतदेह येथील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या शवागारात हलवला,” अधिकाऱ्यांनी सांगितले. या हिंसाचारात भाजपच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला.
ईशान्येकडील राज्यातील मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मेईतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीला विरोध करण्यासाठी पहाडी जिल्ह्यांमध्ये 3 मे रोजी 'आदिवासी एकता मार्च' आयोजित केल्यानंतर प्रथम संघर्ष झाला. मणिपूरच्या लोकसंख्येपैकी 53 टक्के लोकसंख्या मेईतेई आहे आणि ते बहुतेक इम्फाळ खोऱ्यात राहतात. आदिवासी - नागा आणि कुकी - लोकसंख्येच्या आणखी 40 टक्के आहेत आणि ते डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.