Video: मोक्ष मिळावा म्हणून 22 वर्षीय तरुणाने घेतली जमिनीच्या खाली समाधी; 4 पुजाऱ्यांनी केली मदत, पोलिसांनी केली सुटका (Watch)

त्यानंतर त्यांनी खड्डा खणून शुभमला समाधी घेण्यास मदत केली. पोलीस वेळेवर पोहोचले नसते तर अंधश्रद्धेतून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला असता

Viral Video (संग्रहित संपादित प्रतिमा)

उत्तर प्रदेशातील उन्नाव (Unnao) येथे अंधश्रद्धेमुळे एका 22 वर्षीय साधू वेशातील तरुणाने समाधी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोक्ष मिळावा म्हणून चार पुजाऱ्यांच्या मदतीने त्याने मंदिराजवळील मैदानात समाधी घेतली. मात्र वेळीच पोलिसांना याबाबत माहिती मिळाली व त्यांनी घटनास्थळी पोहोचून खड्ड्यातील माती काढून बाहेर कडून तरुणाचा जीव वाचवला. पोलिसांनी या चारही पुजाऱ्यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. हा तरुण 7 मिनिटे खड्ड्यात गाडला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

हे प्रकरण आशिवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजपूर गावचे आहे. बांगरमाऊचे सीओ पंकज कुमार सिंह यांनी सांगितले की, ताजपूर गावातील लोकांनी त्यांना सुचना दिली होती की, 22 वर्षीय शुभम संध्याकाळी मंदिराजवळ समाधी घेण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर पोलीस पथकासह ते घटनास्थळी पोहोचले असता शुभमने समाधी घेतली होती. घटनास्थळी 4 पुजारी या 22 वर्षीय साधूचे दफन करून मातीवर लाल ध्वज फडकवत होते.

हे पाहता पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता शुभमला खड्ड्यातून जिवंत बाहेर काढले. शुभमने सांगितले की, त्याला मोक्ष मिळवायचा आहे, त्यामुळे नवरात्रीच्या एक दिवस आधी त्याने समाधी घेण्याचा संकल्प केला होता. पोलिसांनी साधुवेशमध्ये उपस्थित 4 जणांना अटक करून पोलीस ठाण्यात नेले. सर्वांनी सांगितले की, शुभम चार वर्षांपासून गावाबाहेर एका झोपडीत राहत होता आणि कालीजीची मूर्ती ठेवून पूजा करत होता. (हेही वाचा: Uttar Pradesh: इटावामधील घाटिया अजमत अली भागात भिंत कोसळल्याने 3 मुलांचा मृत्यू)

या पुजारींनी असेही सांगितले की, त्यांनी शुभमला समाधी घेण्यापासून रोखले, परंतु तो ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर त्यांनी खड्डा खणून शुभमला समाधी घेण्यास मदत केली. पोलीस वेळेवर पोहोचले नसते तर अंधश्रद्धेतून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला असता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शुभमचे वडील विनीत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आईच्या निधनानंतरच तो पूजा-पाठमध्ये गुंतला होता.