अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी VHP देशभर राबवणार मोहिम; राम भक्तांकडून घेतली जाणार देणगी
दरम्यान, भव्य राम मंदिर उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून एक अभियान सुरु करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक राम भक्ताचा सहयोग घेण्यात येणार आहे.
अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरु झाले आहे. दरम्यान, भव्य राम मंदिर उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून एक अभियान सुरु करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक राम भक्ताचा सहयोग घेण्यात येणार आहे. 15 जानेवारी पासून VHP कडून हे अभियान सुरु करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत देशभरातील राम भक्तांकडून त्यांच्या इच्छेनुसार आर्थिक देगणी स्वीकारण्यात येईल. विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसंच या अभियानाअंतर्गत आर्थिक सहयोगासाठी 10, 100 आणि 1000 रुपयांचे कूपन उपलब्ध असतील, असेही त्यांनी सांगितले.
चंपत राय पुढे म्हणाले की, अभियानाअंतर्गत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते घरोघरी जातील. देशातील 4 लाख गावातील 11 कोटी कुटुंबियांशी यासाठी संपर्क करण्यात आला आहे. तसंच यासाठी 10 रुपयांचे 8 कोटी, 100 रुपयांचे 4 कोटी आणि 1000 रुपयांचे 12 लाख कूपन्स जारी करण्यात आले आहेत. रामभक्त आपल्या इच्छेनुसार जी काही देगणी देतील, त्याचा स्वीकार करण्यात येईल. त्याचबरोबर प्रत्येक घरात भगवान श्री रामाचा फोटो देखील देण्यात येईल.
मकर संक्रांतीनंतर 15 जानेवारी पासून माघ पौर्णिमेपर्यंत हे अभियान सुरु राहील. राम मंदिराची उभारणी देशातील सर्व जाती, पंथ, संप्रदायाच्या लोकांच्या सहयोगाने होईल. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि गुवाहाटी येथील आयआयटी, सीबीआरआय, एल अँड टी, टाटा चे विशेष इंजिनीयर्सकडून मंदिराचा पाया भक्कम करण्यासाठी सल्ला घेण्यात येईल. याचे स्वरुप लवकरच लोकांपुढे सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. (येथे पहा राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडलचे खास फोटोज!)
दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले. त्यानंतर राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरु झाले आहे. राम मंदिरासाठी देशा-परदेशातून भेटी, दान येत असून आता प्रत्येक रामभक्ताचा सहयोग मंदिर उभारणी असावा, यासाठी या अभियाची सुरुवात होणार आहे. अयोध्या येथील राम मंदिरात 613 किलो वजनाची भव्य घंटा लावण्यात येणार आहे. 4 फुटांच्या या घंटेचा नाद, ध्वनी अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू येणार आहे.