Uttarakhand Glacier Burst Updates: उत्तराखंड दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 28 मृतदेह सापडले, अजूनही 170 लोक बेपत्ता; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

दुसरीकडे बचाव पथकाला आतापर्यंत 28 मृतदेह मिळाले असून, त्यापैकी 24 जणांची ओळख पटली आहे

Rescue Operation at Chamoli (Photo Credits: ANI)

उत्तराखंडच्या (Uttarakhand) दुर्घटनेमध्ये अजूनही कमीतकमी 170 लोक बेपत्ता आहेत, त्यापैकी बोगद्यात अडकलेल्या सुमारे 35 मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दुसरीकडे बचाव पथकाला आतापर्यंत 28 मृतदेह मिळाले असून, त्यापैकी 24 जणांची ओळख पटली आहे. हे सर्व मृतदेह आजूबाजूच्या भागात बोगद्यात व नदीकाठावर सापडले आहेत. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी आज सकाळी सांगितले की, बोगद्यामध्ये अजून पुढे जाण्यात यश आले आहे, मात्र बोगदा अद्याप उघडलेला नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आज सर्व ढिगारा साफ होण्याची शक्यता आहे. या बोगद्यामध्ये अजून 35 लोक अडकल्याची भीती आहे.

या पुरामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. दोन मोठ्या धरणांचे नुकसान झाले आहेत तर 13 गावांचा संपर्क तुटला आहे. डोंगराळ परिसरातील दुर्गम भागांना जोडणारे महत्वाचे रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे. बचाव दल दोरीच्या सहाय्याने  मलेरी व्हॅली भागात पोहोचण्यास यशस्वी झाले आहे आणि आता आवश्यक पॅकेजेस, रेशन तिथे पाठविले जाऊ शकते. पूर्वी हेलिकॉप्टरमार्फत मर्यादित साठा पुरवला जात होता. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी याबाबत माहिती दिली. चमोलीतील हिमकडा आपत्तीमुळे बाधित झालेल्या क्षेत्रांचे त्रिवेन्द्रसिंग रावत यांनी हवाई सर्वेक्षण केले.

यापूर्वी झी न्यूजशी खास बातचीत करताना उत्तराखंडचे सीएम त्रिवेंद्रसिंग रावत म्हणाले की, ग्लेशियर फुटल्याने चामोलीतील आपत्ती उद्भवली नाही. यामागचे खरे कारण शोधण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, या दुर्घटनेमध्ये अजूनही बेपत्ता असलेले लोक उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि ओरिसामधील आहेत. हे सर्व लोक ऋषीगंगा व तपोवन ऊर्जा प्रकल्पात काम करत होते. (हेही वाचा: Uttarakhand Flood: नक्की का घडली उत्तराखंड दुर्घटना? कोण जबाबदार? जाणून घ्या काय म्हणतात Environment Experts)

रविवारी चामोली येथे हिमकडा फुटून तो खाली वाहणाऱ्या ऋषीगंगा नदीत पडला. या नदीवर 13.2 मेगावॅटचा एक छोटा जलविद्युत प्रकल्प तयार करण्यात येत आहे. घटनेमुळे पूर आल्याने या प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले यासह धौलीगंगा नदीवर बांधल्या जाणार्‍या मोठ्या प्रकल्पांचेही नुकसान झाले आहे.