Uttar Pradesh Shocker: शाळेला जाणाऱ्या मुलीचे अपहरण करुन वडिलांच्या मित्राकडूनच बलात्कार
अल्पवयीन मुलगी शाळेला जात असताना तिचे अपहरण झाले. आरोपींनी अपहरण करु नतिला ओयो हॉटेलवर (OYO Rooms) नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार (Gangrape in Hapur) केला.
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील हापूर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी शाळेला जात असताना तिचे अपहरण झाले. आरोपींनी अपहरण करु नतिला ओयो हॉटेलवर (OYO Rooms) नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार (Gangrape in Hapur) केला. धक्कादाय असे की, आरोपी हे पीडितेच्या वडिलांच्या ओळखीचे होते. विद्यार्थीनी ऑटोतून शाळेला निघाली असताना आरोपी दुचाकी रस्त्याकडेला उभी करुन मुलीची वाट पाहात होते. मुलगी दृष्टीक्षेपात येताच त्यांनी ऑटोमधून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. नंतर हॉटेलवर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
आरोपी केवळ सामूहिक बलात्कार करुनच थांबले नाहीत. त्यांनी अत्याचार करतानाचा व्हिडिओ बनवीला. तसेच, घडला प्रकार कोणालाही सांगू नकोस अन्यथा या प्रकाराची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करु आणि तुझ्यासह तुच्या कुटुंबीयांची बदनामी करु, अशी धमकीही त्यांनी पीडितेला दिली. पीडितेने जेव्हा आरोपींच्या अत्याचाराला विरोध केला तेव्हा त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पीडिता इयत्ता 11 वीमध्ये शिकते. पीडितेने घडल्या प्रकाराबद्दल आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली तसेच पीडितेला वैद्यकीय उपचारांसाठी दाखल केले.
हापूरचे पोलीस अधीक्षक राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, पीडितेच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे पीडितेच्या माहितीतील आणि वडिलांच्या थोड्याफार परिचयाचे आहेत. हापूर पोलीस स्टेशन हद्दीतील मोदीनगर रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये बलात्काराची कथीत घटना घडली आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तसेच, आरोपीविरोधात पोक्सो कायद्यासह 376D IPC 307 कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराच्या अनेक घटना घडत असतात. अलिकडेच अंगणात कपडे सुखत घालत असताना मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. आणखी एका प्रकरणात आरोपंनी पीडितेवर बालात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना पुढे आली होती. उत्तर प्रदेश पोलीसांनी अशा अनेक प्रकरणांमध्ये बलात्काराचे गुन्हे दाखल करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. असे असूनही वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये नवनवे आरोपी अशा प्रकारची कृत्ये करताना आढळून येतात. बलात्काराच्या घटना कमी करण्यासाठी सरकारने सामाजिक पातळीवर प्रयत्न करायला हवेत. तरुणांचे, नागरिकांचे समुपदेशन करायला हवे, असे सामाजिक घडामोडीचे अभ्यासक सांगतात. अशा घटनांमुळे महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा वारंवार पुढे येतो आहे.