Uttar Pradesh Shocker: पतीने आपल्या आईला दिले 200 रुपये; चिडलेल्या पत्नीने दोन मुलांसह विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

माहितीनुसार, मयत महिलेच्या पतीने आपल्या आईला 200 रुपये दिले होते, त्यामुळे संतापलेल्या महिलेने आपल्या दोन मुलांना कमरेला बांधून विहिरीत उडी मारली. सध्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) चित्रकूटमधून (Chitrakoot) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. माहितीनुसार, मयत महिलेच्या पतीने आपल्या आईला 200 रुपये दिले होते, त्यामुळे संतापलेल्या महिलेने आपल्या दोन मुलांना कमरेला बांधून विहिरीत उडी मारली. सध्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. चित्रकूट जिल्ह्यातील माणिकपूरमध्ये ही घटना घडली.

या ठिकाणी साबित आणि अंजू हे जोडपे आपल्या कुटुंबासह राहत होते. या दोघांना दोन मुले होती, त्यापैकी एक 8 महिन्यांचा मुलगा होता, त्याचे नाव सुदीप आणि दुसऱ्या मुलाचे नाव सुधीर (वय 3 वर्षे) होते. साबितच्या म्हणण्यानुसार त्याच्या आजीची तब्येत खराब होती व त्यामुळे त्याच्या आईला आपल्या माहेरी जायचे होते. यासाठी त्याने तिला 200 रुपये दिले होते.

ही गोष्ट अंजूला समजताच ती नाराज झाली. तिच्या पतीच्या म्हणण्यानुसार अंजूने यावरून भांडण केले. दोघांमध्ये बराच वेळ वाद झाला, त्यानंतर साबित काही औषध घेण्यासाठी माणिकपूर रुग्णालयात गेला. सायंकाळी घरी आल्यावर त्याला मुले आणि पत्नी दिसले नाहीत. त्यानंतर त्याने आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र तिघेही सापडले नाहीत. परिसरातील लोकांकडे चौकशी केली असता, काही माहिती मिळाली नाही. (हेही वाचा: व्यक्तीला आपल्या बहिणीच्या लग्नात भेट म्हणून द्यायचा होता टीव्ही; संतापलेल्या पत्नीने केली हत्या)

त्यानंतर सुमारे 2 तासांनी दुसऱ्या गावातील काही लोकांनी एका विहिरीत महिलेचा मृतदेह आढळल्याचे त्याला सांगितले. ते एकूण तो घटनास्थळी धावला. साबित विहिरीजवळ पोहोचला असता स्थानिक लोकांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढल्याचे दिसले. ते मृतदेह त्याची पत्नी व मुलांचे होते. हे पाहून साबीतच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला.