Uttar Pradesh: लग्नाहून परतणाऱ्या तरुणीवर चाकूचा धाक दाखवत सामूहिक बलात्कार

दिवसागणित अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत असताना आता यात अजून एक घटनेची भर पडली आहे.

Rape | Representational Image (Photo Credits: ANI)

बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाही. दिवसागणित अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत असताना आता यात अजून एक घटनेची भर पडली आहे. लग्नावरुन परतणाऱ्या तरुणीवर सामुहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधून समोर येत आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिघांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणी मुळची दिल्लीची असून ती नातेवाईकांच्या लग्नासाठी उत्तर प्रदेशला गेली होती. त्यावेळेस बिजनौर जिल्ह्यातील सबळपूर बित्रा गावात ही घटना घडली.

पीडित तरुणी 13 सप्टेंबर रोजी लग्नासाठी दिल्लीहून बिजनौर येथे आली होती. दुसऱ्या दिवशी घरी परतण्यासाठी ती बस स्टँडवर उभी होती. त्यावेळी तिघा पुरुषांनी त्यांची कार तिच्याजवळ थांबवली आणि तिला कुठे जायचे असल्याचे विचारले. दिल्लीला जायचे असल्याचे तिने सांगितल्यानंतर तिला बिजनोर शहरापर्यंत सोडण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर गाडीत चाकूचा धाक दाखवत तिघांनी बलात्कार केल्याचे तरुणीने सांगितले आहे. त्यानंतर तिघांनीही घटनास्थळावरुन पळ काढला.

या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तिने घर गाठले. दरम्यान, पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई न केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. (Thane Rape Case: ठाण्यामध्ये 6 वर्षाच्या मुलीवर मामानेच केला बलात्कार, पोलिसांकडून आरोपीला अटक)

दरम्यान, लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनाही अनेकदा समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी मुंबईत सोसायटीच्या वॉचमनने 11 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचे प्रकरण उघडीकस आले होते. कांजूरमार्ग येथील हनुमान गल्ली येथे राहणारा 29 वर्षीय आरोपी तब्बल महिनाभर मुलीवर अत्याचार करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.