Uttar Pradesh Elections Results 2022: प्रियंका गांधी यांनी काम करुनही उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का, काय असतील कारणे?
'लड़की हूं, लड़ सकती हूं' हा नारा देत त्यांनी उत्तर प्रदेश पिंजून काढला खरा. परंतू, प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election Results 2022) रिंगणात या सर्व मेहनतीचे पर्यावसन मतांमध्ये करण्यात मात्र त्यांना यश आले नाही.
काँग्रेस (Congress ) नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) यांनी उत्तर प्रदेशमध्ये या वेळी जोरदार मेहनत केली. 'लड़की हूं, लड़ सकती हूं' हा नारा देत त्यांनी उत्तर प्रदेश पिंजून काढला खरा. परंतू, प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election Results 2022) रिंगणात या सर्व मेहनतीचे पर्यावसन मतांमध्ये करण्यात मात्र त्यांना यश आले नाही. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने जमीनीवर काम करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यासाठी महिलांना 40% जागांवर उमेदवाही देण्याचा अभूतपूर्व असा ऐतिहासिक निर्णयही घेतला. पण यश नाही आले. महत्त्वाचे म्हणजे प्रियंका गांधी यांनी या वेळी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे पूर्णवेळ नेतृत्व केले. तरिही पक्षाला यश सोडा किंमान कमगिरीही करता आली नाही. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पराभवाची ही काही प्रमुख कारणे.
काँग्रेसने 2017 मध्ये समाजवादी पक्षासोबत निवडणूक लढवली होती. त्या वेळी पक्षाने राहुल गांधी यांना पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून पुढे केले होते. त्याही वेळी राहुल आणि अखिलेश यांच्या जोडीने जोरदार काम केले होते. परंतू, त्या वेळीही यश मिळविण्यास ही आघाडी अयशस्वी ठरली. काँग्रेस आणि सपा या वेळी वेगवेगळे लढले. मात्र, काँग्रेसची कामगीरी तुलनेत पाठिमागच्या वेळेसारखीच राहिली. काँग्रेस या वेळी जमीनीवर दिसली. मात्र, त्यांना पक्षाचा अश्वासक चेहरा जनतेच्या मनात ठसविण्यात यश आले नाही.
- अखिलेश यादव यांनी या वेळी काँग्रेसपासून दूर राहणे पसंत केले. परिणामी काँग्रेस एकटी पडली. समाजवादी पक्षाने सुभासपा, रालोद यांसारख्या पक्षाशी हातमिळवणी केली.
- भाजपचा आक्रमक प्रचारही काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरला. भाजपने काँग्रेसवर केलेले परिवारवाद आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे खोडून काढण्यात काँग्रेसला म्हणावे तसे यश आले नाही.
- काँग्रेसचे संघटनही आता म्हणावे तसे राहिले नाही. काँग्रेसची जमीनीवरील कार्यकर्त्यांची जमनीवरील विण पूरती उसवली आहे. त्यामुळे पक्षात उत्साह आणि सूसूत्रता यांचा प्रचंड आभाव राहिला आहे. विद्यमान नेतृत्वाला तो भरुन काढता आला नाही.
- उत्तर प्रदेशमध्ये 403 जगांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी आणि काँग्रेस, बसपा असा सामना पाहायला मिळाला. आता काहीही आकडे आले तरी संपूर्ण चित्र सर्व निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभांसाठी झालेल्या निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. प्रदीर्घ काळ प्रचार आणि विविध टप्प्यांमध्ये हे मतदान पार पडले. या मतदानाबाबत निर्माण झालेली उत्सुकता आज संपणार आहे. आज सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणी पोस्टल बॅलेट मतांपासून सुरु झालेल्या मतमोजणीनंतर आता ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरु आहे. उत्तर प्रदेशसाठी 403, पंजाब- 117, उत्तराखंड- 70 आणि गोव्यासाठी 40 जागांसाठी या ठिकाणी मतदान झाले. मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद केले. आज या उमेदवारांबाबत जनतेच्या मनात काय आहे हे स्पष्ट होणार आहे.