ATS मध्यवर्ती कार्यालयात जवानाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, पत्नीसोबतच्या वादातून कृत्य
मंगळवारी सकाळी तो योगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्रमासाठी आपल्या गावी गोरखपूर येथे जाणार होता.
ATS मध्यवर्ती कार्यालयात एका जवानाने परवाना असलेल्या पिस्तूलातून स्वत:वरच गोळी झाडत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना लखनऊ येथील दहशतवादविरोधी पथक (Anti-Terrorism Squad) मुख्यालयात घडली. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. मात्र, पत्नीसोबतच्या वातातून जवानाने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे एटीएस कार्यालयात एकच खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार, बृजेश कुमार यादव (वय 40) असे या जवानाचे नाव आहे. मंगळवारी (8 ऑक्टोबर 2019) सकाळी त्याने आत्महत्या केली तेव्हा तो कर्तव्यावर तैनात होता. कर्तव्यावर असताना त्याने परवाना असलेली हातातील पिस्तूल आपल्या कानशिलाजवळ आणली आणि थेट गोळी झाडली. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करताना या जवानाने हे कृत्य का केले असावे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच, घटनास्थळी काही सुसाईड नोट वैगेरे मिळते का ते पाहण्याच प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही प्रकारचे कारण अथवा सुसाईड नोट प्रथमदर्शनी मिळाली नाही. (हेहीक वाचा, उत्तर प्रदेश: वायुसेनेतील माजी कर्मचाऱ्याची आत्महत्या, सुसाईट नोटमध्ये आर्थिक मंदीचे कारण देत चिदंबरम यांना ठरवले दोषी)
पोलिस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेला बृजेश कुमार यादव हा जवान एटीएसच्या सरकारी बराकीत राहात असे. मंगळवारी सकाळी तो योगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्रमासाठी आपल्या गावी गोरखपूर येथे जाणार होता. दरम्यान, सांगितले जात आहे की, सोमवारी रात्री बृजेश कुमार यादव आणि त्याच्या पत्नीत काही कारणावरुन वाद झाला होता. या वादातून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले.