Uttar Pradesh: अवघ्या 9 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार; आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरु

डॉक्टरांनी सांगितले की मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपींविरुध्द आयपीसी आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एका 9 महिन्यांच्या बाळावर बलात्कार (Rape) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी उत्तर प्रदेशच्या खुर्जा ग्रामीण भागातील एका 9 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 18 वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर हा युवक फरार आहे. खुर्जा सर्कल ऑफिसर सुरेश कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, खुर्जा ग्रामीण भागातील एका महिलेने तक्रार दिली असून त्यानुसार शेजारी राहणाऱ्या एका युवकाने या महिलेच्या नऊ महिन्यांच्या मुलीला घरी खेळवण्याच्या बहाण्याने नेले होते.

थोड्या वेळाने, स्थानिकांनी मुलीला रडताना ऐकले आणि कुटूंबाला संशय आला की, या युवकाने मुलाला त्रास दिला असावा. मात्र, तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. प्राथमिक तपासणीत तरुणाने मुलीवर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सांगितले की, वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, घटनेनंतर या मुलीला घाईघाईने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे तिच्यावर उपचार चालू आहे. डॉक्टरांनी सांगितले की मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपींविरुध्द आयपीसी आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीच्या तीन नातेवाईकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. (हेही वाचा: Banglore: ब्रेकअप झाल्याच्या रागात प्रियकारकडून काही गाड्यांची तोडफोड)

दुसरीकडे, उत्तर प्रदेश बागपत येथील अल्पसंख्यक समुदायातील तरुणांवर एका अनुसूचित जातीच्या मुलीने आरोप बलात्काराचा आरोप केला आहे. मुलीचे म्हणणे आहे की, मुलाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार केला तसेच जबरदस्तीने धर्मपरिवर्तनही घडवले. या प्रकरणात मुख्य आरोपी आणि त्याच्या पालकांना अटक करण्यात आली आहे.