UP Schocker: यूपी पोलीस कॉन्स्टेबलला विभागाने दिली नाही रजा; वेळेत उपचार न मिळाल्याने पत्नी आणि नवजात बाळाचा मृत्यू, चौकशीचे आदेश
अशात शुक्रवारी पत्नीला अचानक प्रसूती वेदना होऊ लागल्या. त्यानंतर विकासने ताबडतोब त्याच्या पोलीस स्टेशनच्या प्रमुखांकडे रजेसाठी अर्ज केला. त्याने अर्जात नमूद केले की, त्याला पत्नीची काळजी घेण्यासाठी घरी जावे लागणार आहे व त्यासाठी रजा हवी आहे.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) जालौन जिल्ह्यात पोलीस खात्याला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथील एका हवालदाराला पोलीस स्टेशन प्रभारीने रजा दिली नाही, ज्यामुळे तो त्याच्या आजारी पत्नीच्या मदतीला पोहोचू शकला नाही. परिणामी वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याची गर्भवती पत्नी आणि त्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण जिल्ह्यातील रामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. विकास असे हा हवालदाराचे नाव आहे.
अहवालानुसार, विकास निर्मल दिवाकर हा मूळचा मैनपुरीचा (Mainpuri) रहिवासी आहे. त्याची पत्नी ज्योती आपल्या कुटुंबासह गावाकडे राहत होती. विकासची पत्नी गरोदर होती व लवकरच तिची प्रसूती होणार होती. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांत विकास हा पत्नीची काळजी घेण्यासाठी रजा घेऊन घरी जात होता. त्याच्या पत्नीवर आग्रा येथे उपचार सुरु होते व प्रसूतीसाठीदेखील त्याला पत्नीला आग्रा येथे दाखल करायचे होते.
पत्नीची तपासणी करवून विकास गेल्या महिन्यातच ड्युटीवर आला होता. अशात शुक्रवारी पत्नीला अचानक प्रसूती वेदना होऊ लागल्या. त्यानंतर विकासने ताबडतोब त्याच्या पोलीस स्टेशनच्या प्रमुखांकडे रजेसाठी अर्ज केला. त्याने अर्जात नमूद केले की, त्याला पत्नीची काळजी घेण्यासाठी घरी जावे लागणार आहे व त्यासाठी रजा हवी आहे. मात्र पोलीस ठाणे प्रमुखांनी विकासने याआधी खूप रजा घेतल्याचे कारण सांगत त्याचा अर्ज फेटाळून लावला. यामुळे विकास खूप निराश झाला. (हेही वाचा: BJP Candidate Sarvesh Kumar Death: मोरादाबाद येथे मतदान झाल्यानंतर उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांच निधन, दीर्घ आजाराशी झुंज अपयशी)
त्यानंतर त्याने कुटुंबीयांना पत्नीला तातडीने रुग्णालयात नेण्यास सांगितले. मैनपुरीमधील त्याच्या कुटुंबीयांनी पत्नीला कुरवली सीएचसीमध्ये नेले व तिथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. काही वेळाने पत्नीने एका मुलीला जन्म दिला. पण दोघींची प्रकृती ठीक नव्हती. तिथून दोघींना मैनपुरी जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. येथे काही तास त्यांच्यावर उपचार करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती सुधारली नाही. अखेर दोघींना आग्रा येथे रेफर करण्यात आले. रुग्णवाहिकेतून ते आग्र्याला निघाले असता वाटेतच दोघींचा मृत्यू झाला. विकासच्या पत्नीची ही पहिलीच प्रसूती होती. विकासचे 3 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, विकास त्याच्या पत्नीची खूप काळजी घेत असे. तिच्यावर चांगल्या डॉक्टरांकडे उपचार सुरु होते. जर त्याला त्यादिवशी सुटी मिळाली असती तर त्याने लगेच पत्नीला आग्रा येथे एका चांगल्या रुग्णालयात भरती केले असते व दोघींचे प्राण वाचले असते. पोलीस विभागाच्या निष्काळजीपणामुळे आई आणि मुलीला आपला जीव गमवावा लागला.