युपी: बुलंदशहर येथील साधूंच्या हत्येवरून संजय राऊत यांनी केलेल्या टिपण्णीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले 'हे' चोख उत्तर
राऊत यांच्या या टिपण्णीवर युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या ऑफिसच्या ट्विटरवरून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बुलंदशहर (Bulandshahar) भागात काल मंदिरातील दोन साधूंची हत्या झाल्याचे उघड झाले होते, अलीकडेच पालघर (Palghar) मध्ये झालेल्या साधूंच्या हत्येनंतर ही घटना लागोपाठ घडल्याने यावर अनेकांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया दिल्या होत्या, निदान आता या धार्मिक राजकारण करू नका असे सर्वांनीच सुचवले होते. अशाच धाटणीची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुद्धा ट्विटच्या माध्यमातून दिली होती. राऊत यांच्या या टिपण्णीवर युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या ऑफिसच्या ट्विटरवरून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, युपीची चिंता करू नका. इथे कायदा पाळला जातो त्यामुळे बुलंदशहर येथे घडलेल्या घटनेतील दोषींना नक्कीच शिक्षा दिली जाईल असे या ट्विट मध्ये म्हंटलेले आहे. तसेच जेव्हा पालघर मध्ये हत्या झाली तेव्हा त्यातील साधू हे निर्मोही आखाड्याशी संलग्न होते म्ह्णूनच युपीच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कॉल केला होता पण याचे राजकारण केले गेले आता ते कोणी केले हे ही सांगा अशा शब्दात एक ट्विट मधून योगी आदित्यनाथ यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार सुद्धा केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
उत्तर प्रदेशातील घटना भयंकर आहे मात्र पालघरच्या घटनेप्रमाणे याला कोणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नये. बुलंदशहर हत्या प्रकरण: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा योगी आदित्यनाथ यांना फोन; पाहा काय म्हणाले?
योगी आदित्यनाथ यांचे राऊतांना उत्तर
योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयीन ट्विटर अकाउंट वरून राऊतांना उत्तर देण्यात आले आहे ज्यानुसार, "उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे. बुलंदशहर घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सांभाळा उत्तर प्रदेशची चिंता करु नका". असे म्हंटले आहे. तसेच पुढील एका ट्विट मध्ये म्हणातल्या प्रमाणे "पालघर मधील साधुंच्या हत्येबद्दल कोण राजकारण करत आहे, जेव्हा आम्ही काळजीनी उद्धव ठाकरे यांना संपर्क करून विचारणा केली त्याला राजकारण तुम्ही जोडत आहात. हे कुविचार आहेत जे फूट पाडण्याचे राजनैतिक संस्कार दाखवतात" अशा कठोर शब्दात राऊत यांना सुनावले आहे.
दरम्यान, बुलंदशहर भागात मंदिरातील दोन पुजारी साधूंची निव्वळ बदल्याच्या भावनेतून हत्या करण्यात आली होती, तर पालघर मधील घटनेत चोर समजून दोन साधू आणि त्यांच्या ड्रॉयव्हरला काठीने, दगडाने ठेचून मारण्यात आले होते. या दोन्ही घटना सध्या प्रचंड चर्चेत आहेत.