Hathras Case: हाथरस घटना प्रकरणी सीएम योगी आदित्यनाथ सरकारची मोठी कारवाई; एसपी, डीएसपी, इन्स्पेक्टर आणि इतर अधिकाऱ्यांना केले निलंबित
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मिडियावरही याबाबत आपला राग व्यक्त केला आहे. विरोधी पक्षांकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
हाथरस (Hathras) येथे घडलेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी देशात विविध ठिकाणी निषेध नोंदवला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मिडियावरही याबाबत आपला राग व्यक्त केला आहे. विरोधी पक्षांकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता योगी सरकार हाथरस प्रकरणात अॅक्शन मोडमध्ये आली आहे. शुक्रवारी उशीरा, हाथरस प्रकरणात दुर्लक्ष झाल्याने युपी सरकारने एसपी विक्रम वीर (SP Vikrant Vir), डीएसपी राम शब्द, निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, उपनिरीक्षक जगवीर सिंह आणि प्रमुख मुर्रा महेश पाल यांना निलंबित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत डीएम प्रवीण कुमार (DM Pravin Kumar) यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
या आदेशानंतर एसपी शामली विनीत जयस्वाल यांची एसपी विक्रांत वीर यांच्या जागी हाथरसचे नवे एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हाथरस प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या दोन्ही बाजूंच्या (पीडित आणि आरोपी) आणि पोलिस अधिकारी यांच्या नार्को चाचण्या घेण्यात येणार आहेत.
एएनआय ट्वीट -
आधी पीडित मुलीशी आणि नंतर कुटूंबाशी पोलिसांनी केलेल्या व्यवहारानंतर यूपी सरकारवर टीका होत आहे. या प्रकरणी सर्व बाबी उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी एसआयटीची स्थापना केली होती आणि 7 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पण एसआयटी हाथरस येथे पोहोचल्यानंतर प्रकरण आणखीनच चिघळले. प्रथम नेत्यांना हाथरस येण्यापासून रोखले गेले आणि त्यानंतर माध्यमांनाही बंदी घातली गेली. हे गाव पूर्णपणे सीलबंद करण्यात आले असून, पिडीतेच्या घरी सुमारे 200 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. (हेही वाचा: हाथरस प्रकरणी दिल्लीच्या जंतर मंतर येथे निषेध; CM Arvind Kejriwal, चंद्रशेखर आझाद, स्वरा भास्करही आंदोलनात सामील)
दरम्यान, आज सायंकाळी दिल्लीतील (Delhi) जंतर-मंतरवर (Jantar Mantar) शेकडो लोक हाथरस प्रकरणाच्या निषेधासाठी जमले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनीही येथे हजेरी लावली होती. यासह सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी, माकपचे नेते डी. राजा, आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज, जिग्नेश मेवाणी, बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर, भीमा आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद देखील या ठिकाणी पोहोचले होते.