Union Budget Session 2021: कृषी कायदे, लाल किल्ला हिंसाचार प्रकरण ते कोविड 19 संकट पहा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिभाषणात काय म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद!
सरकारने वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत झाल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच देशात मोठ्या कोविड 19 लसीकरणाचंही कौतुक केले आहे.
नव्या दशकाचं पहिलं अधिवेशन आजपासून दिल्लीच्या संसदेत सुरू होत आहे. दरम्यान आजच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले आहे. त्यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित केले. यावेळी राष्ट्रपतींनी कृषी कायदे, शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर झालेला हिंसाचार ते अगदी कोविड 19 संकट अशा विविध मुद्यावर चर्चा केली. कोविड संकटकाळात सरकारने तातडीने उचललेल्या पावलांमुळे अनेकांचे जीव वाचवण्यास मदत झाली असे देखील त्यांनी आजच्या अभिभाषणात नमूद करत मोदी सरकारची पाठ थोपटली आहे.
देशात सध्या कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाची चर्चा आहे. त्याची झलक आजच्या अभिभाषणात दिसली. रामनाथ कोविंद यांनी आज त्याबद्दल माहिती देताना नीट चर्चेनंतर संसदेत सात महिन्यांपूर्वी नवे 3 कृषी कायदे पारीत करण्यात आले. या कृषी सुधारणांचा फायदा कोट्यावधी लहान मोठ्या शेतकऱ्यांना मिळायला सुरूवात झाली.लहान शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणांना पाठिंबा दिला होता. मात्र आता यावर कोर्टाने स्थगिती दिली आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. पण नव्या कायद्यांमुळे जुन्या सुविधा आणि अधिकारांना धक्का लावला जाणार नाही असं म्हटलं आहे.
कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार प्रत्येक आंदोलनाच आदर करते पण प्रजासत्ताक दिनी झालेल्या लाल किल्ल्यावरील हिंसाचाराचा निषेध करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारताच्या तिरंग्याचा अशाप्रकारे अपमान होणं ही दुर्भाग्याची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच त्यांनी . कृषी क्षेत्राला अधिक लाभ देण्यासाठी सरकार कृषी क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधांवर काम करत आहे असे म्हटलं आहे.
भारतामध्ये आता कोविड 19 संकटावर आपण नियंत्रण मिळवत आहोत याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सरकारने वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत झाल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच देशात मोठ्या कोविड 19 लसीकरणाचंही कौतुक केले आहे.