Union Budget 2021: अर्थसंकल्पीय अधिवेशननात कृषी कायद्यांना विरोध; राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेससह 16 पक्षांचा बहिष्कार

विशेष म्हणजे मायावती यांचा बहुजन समाज पक्ष या यादीत नाही.

Ghulam Nabi Azad | (Photo Credits-Facebook)

केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Union Budget 2021) येत्या शुक्रवारपासून (29 जानेवारी 2021) सुरु होत आहे. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीस होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस पक्ष आणि इतर 16 राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकणार असल्याचे म्हटले आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आजाद (Ghulam Nabi Azad) यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षांशी चर्चा न करताच केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे (Farm Laws 2020) मागे घ्यावेत यासाठी आम्ही सर्व पक्षांनी मिळून हा निर्णय घेतल्याचेही आजाद यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याच्या निर्णयाबाबत काँग्रेसने एक संयुक्त निवेदनही प्रसिद्ध केले आहे. यात म्हटले आहे की, भारतातील शेतकरी केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात लढत आहेत. हे कायदे कृषी क्षेत्रासाठी एक धोका आहेत. देशातील 60 टक्के जनता ही शेतीवर अवलंबून आहे. थंडी, उन, वारा पाऊस असतानाही हे शेतकरी गेली 64 दिवस दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडूण बसले आहेत. हे शेतकरी न्याय मागत आहेत. सुमारे 155 शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. असे असताना उलट केंद्र सरकार त्यांच्यावर अश्रूधुराचा मारा करत आहे. पाणी मारत आहे. लाठीमार करत आहे. केंद्र सरकारच्या या वर्तनाचा आम्ही तीव्र निशेध करतो.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणारे प्रमुख पक्ष

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, JKNC, SP, RJD, CPI (M), CPI, शिवसेना, अकाली दल, राष्ट्रवादी काँग्रेस, IUML, केरल काँग्रेस , आम आदमी पार्टी यांच्यासह या यादीत 16 पक्षांची नावे आहेत. विशेष म्हणजे मायावती यांचा बहुजन समाज पक्ष या यादीत नाही. (हेही वाचा, Rahul Gandhi On Farmers' Protest: आक्रमक शेतकरी आंदोलकांना राहुल गांधी यांचा सल्ला, ट्विट करत म्हटले 'हिंसा हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही')

उद्यापासून केंद्र सरकाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारीला केंद्र सरकार आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. अर्थसंकल्पात मोदी सरकार आता कोणाकोणाला खूश करते आहे आणि सर्वसामान्यांना काय देते याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. वेगाने धावणाऱ्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे कसे करायचे ते मोदी सरकारकडून शिकावे, असे गांधी यांनी म्हटले आहे.