Unemployment in India: भारतातील रोजगाराची स्थिती अत्यंत गंभीर; देशातील बेरोजगारांमध्ये 83 टक्के तरुणांचा समावेश- Reports
अजूनही मोठा वर्ग डिजिटली साक्षर नाही. अनेकांना सामान्य माहितीही नसते, त्यामुळे त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.
Unemployment in India: नुकतेच मार्चमध्ये जगभरातील अनेक मोठ मोठ्या टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नोकर कपात केल्याची माहिती समोर आली. अशात भारतातही बेरोजगारी (Employment) शिगेला पोहोचली असल्याचे निदर्शनास येत आहे. निवडणुकीच्या वातावरणात देशातील बेरोजगारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) अहवालात भारतातील रोजगाराच्या परिस्थितीबाबत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात मोठी गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे, देशातील एकूण बेरोजगारांपैकी तब्बल 83 टक्के लोक तरुण आहेत. आयएलओने मानव विकास संस्था (IHD) च्या सहकार्याने 'इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024' प्रकाशित केला आहे.
देशातील एकूण बेरोजगार तरुणांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वर्षे 2000 च्या तुलनेत आता दुप्पट झाल्याचेही आयएलओच्या अहवालात उघड झाले आहे. सन 2000 मध्ये सुशिक्षित तरुण बेरोजगारांची संख्या एकूण तरुण बेरोजगारांच्या 35.2 टक्के होती. 2022 मध्ये हे प्रमाण 65.7 टक्के झाले. यामध्ये केवळ दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या सुशिक्षित तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. आयएलओ म्हणते की, भारतात माध्यमिक (10वी) नंतर शाळा सोडण्याचे प्रमाण अजूनही उच्च पातळीवर आहे.
अहवालानुसार, 2019 पासून नियमित कामगार आणि स्वयंरोजगार असलेल्या लोकांच्या उत्पन्नात घट होत आहे. त्याच वेळी, अकुशल कामगार दलातील प्रासंगिक कामगारांना 2022 मध्ये योग्य किमान वेतन मिळालेले नाही. काही राज्यांमध्ये रोजगाराची स्थिती अत्यंत दयनीय आहे, ज्यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगड यांचा समावेश आहे. भारतासाठी हा अत्यंत कठीण काळ आहे. भारतातील सुमारे 27 टक्के लोकसंख्या तरुणांची आहे, परंतु त्यातील मोठा भाग बेरोजगार आहे. (हेही वाचा: Tech Layoffs March 2024: टेक क्षेत्रातील नोकऱ्यांवर संकट! मार्चमध्ये Apple, Dell, IBM सह अनेक कंपन्यांनी केली नोकर कपात)
बेरोजगारांची संख्या वाढण्यामागे तरुणांमधील कौशल्याचा अभाव हेही कारण आहे. अजूनही मोठा वर्ग डिजिटली साक्षर नाही. अनेकांना सामान्य माहितीही नसते, त्यामुळे त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या काळातही बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली होती. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. या काळात कमी शिकलेल्या लोकांपेक्षा जास्त शिक्षित लोकांच्या नोकऱ्या गेल्या.