धक्कादायक! बलात्काराचा प्रयत्न फसल्यानंतर काकाने केली आपल्या 17 वर्षीय पुतणीची हत्या, गुन्ह्यामध्ये पीडितेची काकीही सहभागी
मुख्य म्हणजे या संपूर्ण गुन्ह्यात त्या पीडितेची काकी देखील सामील होती. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
देशभरात बलात्काराच्या गुन्ह्यावर कठोर कारवाई होताना दिसत असताना देखील बलात्काराचे गुन्हे काही आटोक्यात येताना दिसत नाहीय. यातच नवी दिल्लीत (Navi Delhi) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काकानेच आपल्या अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाल्याने काकाने आपल्या पुतणीची घरातच हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना दिल्लीतील नंदगिरी परिसरात घडली आहे. मुख्य म्हणजे या संपूर्ण गुन्ह्यात त्या पीडितेची काकी देखील सामील होती. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी आपल्या काकाकडे राहायला आली होती. मात्र मागील महिन्यात 23 ऑक्टोबरपासून ती बेपत्ता झाली होती. यावर पोलिसांनी चौकशी केली असता आपण मुलीला उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील अनाथाश्रमात सोडल्याचे सांगितले. मात्र चौकशीनंतर अशी कोणत्याही मुलीची नोंद तिथे नसल्याचे आढळून आले. त्याचदरम्या आरोपी वकील पोदार बेपत्ता झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली आणि चौकशीअंती त्याने गुन्हा कबूल केला. हेदेखील वाचा- Nalasopara Rape Case: नालासोपारा परिसरात 28 वर्षीय महिलेवर बलात्कार, नराधमांना 3 नोव्हेंबर पर्यंत सुनावली पोलीस कोठडी
या आरोपीने मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला असता मुलीने विरोध केला. त्यामुळे त्याचा हा प्रयत्न फसल्यानंतर त्याने आपल्या पत्नीच्या मदतीने त्या मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह घरातील बेड बॉक्समध्ये भरून ठेवला. या हत्येदरम्यान आरोपीची पत्नी घराबाहेर पहारा देत होती असे देखील पोलिसांनी सांगितले.
या मुलीवरून पती-पत्नीमध्ये प्रचंड वाद होत होते. तिला गावी पाठवा नाहीतर तिला मारून टाका अशी त्याची पत्नी त्याला वारंवार म्हणायची. तर मुलीने गावी जाऊ नये असे वकील पोदार याचे म्हणणे होते. तसेच त्या मुलीला शिक्षण पूर्ण करायचे होते त्यामुळे ती गावी जाण्यास तयार नव्हती. सदर घटनेत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहे.