धक्कादायक! तामिळनाडू मध्ये मोबाईल चार्जिंगला लावल्याने लागलेल्या आगीत आईसह दोन मुलांचा मृत्यू

मात्र आता तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील करुरू (Karur) या ठिकाणी मोबाईलचा स्फोट झाल्याने

Representation Image (Photo Credits: YouTube)

याआधी नांदेड, नाशिक, अंबरनाथ, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी मोबाईलच्या स्फोटामुळे मोठी हानी झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र आता तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील करुरू (Karur) या ठिकाणी मोबाईलचा स्फोट झाल्याने आईसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोबाईलचा स्फोट झाल्यावर लागलेल्या आगीमध्ये या तिघांचा मृत्यू झाला. रिपोर्ट्सनुसार मोबाईल चार्जिंगला लावला असता त्यामध्ये स्पार्क्स झाले व त्यामुळे आग लागली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे मुले रुग्णालयात नेत असताना दगावली.

वृत्तानुसार, मुथुलक्ष्मी (29) ही करूर शहराजवळील रायनूर येथे एका घरात राहत होते. तिची जुळी मुले सुमारे तीन वर्षांची होती. सहा वर्षांपूर्वी तिचे 31 वर्षीय बालकृष्णनसोबत लग्न झाले होते आणि ते रायनूरजवळ एक छोटेसे हॉटेल चालवत होते. सुमारे 2.5 वर्षांपासून मुथुलक्ष्मी घरगुती मुद्द्यांमुळे पतीपासून विभक्त झाली होती आणि ती दोन मुले व आई-वडिलांसह रायनूरमध्ये एकटीच राहत होती. लॉकडाऊन दरम्यान तिला पैसे मिळण्याचे कोणतेही साधन नसल्याने, मुथुलक्ष्मीने आपल्या पालकांना रामनाथपुरममधील नातेवाईकांकडून पैसे घेण्यासाठी शहराबाहेर पाठवले होते. (हेही वाचा: नाशिक येथे चार्जिंगला लावलेल्या MI मोबाईलचा स्फोट; घरातीन अनेक वस्तू जळाल्या)

रविवारी रात्री मुथुलक्ष्मी सोफ्यावर झोपली होती व तिचा फोन चार्जिंगला लावला होता. सोमवारी सकाळी साधारण 6 वाजता शेजाऱ्यांना तिच्या घरातून धूर निघत असल्याचे जाणवले. शेजारी घराचे दार तोडून तिच्या घरात घुसले त्यावेळी त्यांनी मुथुलक्ष्मीचा मृतदेह व तिची दोन मुले आढळली. त्यानंतर ताबडतोब मुलांना रुग्णालयात हलवले मात्र रस्त्यातच या मुलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांचे मृतदेह करूरच्या सरकारी रुग्णालयात नेले, जेथे शवविच्छेदन केले जात आहे. नंतर मृतदेह मुथुलक्ष्मीच्या पालकांना देण्यात येणार आहेत. दरम्यान, पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूबद्दल एफआयआर नोंदविला आहे व तपास सुरू आहे.