रेल्वे क्रॉसिंग तोडून ट्रकची राजधानी एक्सप्रेसला धडक ; ड्रायव्हरचा मृत्यू
गोधरा आणि रतलामच्या दरम्यान त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेसला ट्रकची टक्कर झाली.
मध्य प्रदेशात गुरुवारी सकाळी एक भयंकर अपघात झाला. गोधरा आणि रतलामच्या दरम्यान त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेसला ट्रकची टक्कर झाली. या धडकेमुळे राजधानी एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून खाली उतरले. या दुर्घटनेत ट्रक ड्रायव्हरचा घटनास्थळी मृत्यू झाला. मात्र जखमींचा आकडा अद्यापही कळू शकलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना गोधरा आणि रतलामदरम्यान असलेल्या क्रॉसिंगजवळ झाली. या दुर्घटनेनंतर ट्रेनमधील प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनमध्ये रवाना करण्यात आले. रेल्वे अधिकारी या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.
रेल्वे मंत्रालयच्या मीडिया आणि कॉर्पोरेट संचार दिग्दर्शक राजेश दत्त बाजपेयी यांनी सांगितले की, "ही दुर्घटना सकाळी सुमारे 6.44 च्या दरम्यान झाली. ट्रक क्रॉसिंग गेट तोडून आत घुसला आणि थेट निजामुद्दीन-त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेसच्या बी7 आणि बी8 डब्यांवर धडकला."
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये ट्रेनची मोठी दुर्घटना झाली होती. रायबरेलीजवळच्या हरचंदपूरमध्ये न्यू फरक्का एक्सप्रेसचे 5 डब्बे रुळावरुन खाली उतरले होते. या दुर्घटनेत 7 लोकांचा मृत्यू झाला होता. तर सुमारे 21 जण जखमी झाले होते.