Train 18: देशातील सर्वात जलद ट्रेन 'वन्दे भारत एक्सप्रेस'ची पहिली फेरी 15 फेब्रुवारीला; पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पहिली सफर
एक्स्प्रेसच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली ते बनारस हा प्रवास वन्दे भारत एक्स्प्रेसने करतील.
'ट्रेन 18' (Train 18) म्हणजेच 'वन्दे भारत एक्स्प्रेस' (Vande Bharat Express) पहिल्यांदा 15 फेब्रुवारीला धावणार आहे. एक्स्प्रेसच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दिल्ली ते बनारस हा प्रवास वन्दे भारत एक्स्प्रेसने करतील. मोदी 8 तासांचा हा प्रवास एग्झीक्युटिव्ह चेअर कारमधून करतील. या प्रवासात मोदींसोबत रेल्वेचे काही निवडक अधिकारी असतील.
असा असेल प्रवास
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता ही ट्रेन रवाना होईल. 16 डब्ब्यांची ही ट्रेन दिल्ली आणि वाराणसी दरम्यान प्रवास करेल. दिल्लीवरुन निघालेली ही ट्रेन प्रथम कानपूर येथे थांबेल. तेथे पंतप्रधान मोदींचे भाषण होईल. त्यानंतर 40 मिनिटांनी ही ट्रेन इलाहाबाद येथे 40 मिनिटे थांबेल. तेथे पुन्हा मोदींचे भाषण होईल. त्यानंतर ही ट्रेन बनारसच्या दिशेने रवाना होईल. बनारसमध्ये पुन्हा एकदा पीएम मोदी जनतेला संबोधित करतील.
'वन्दे भारत एक्स्प्रेस'ची खासियत
# ही देशातील पहिली इंजिनलेस ट्रेन असेल.
# संपूर्ण ट्रेन वातानुकूलित आहे.
# दिल्लीहून सुटणारी ही ट्रेन फक्त कानपूर आणि इलाहाबाद या दोन स्थानकांवर थांबेल.
# प्रवासी कम्पार्टमेंटमध्ये टचफ्री ऑटोमॅटीक दरवाजे असतील.
# ट्रेनच्या स्पीडची माहिती प्रवाशांना मिळणार.
# वायफाय आणि इंफोटेनमेंटची सुविधा.
# ड्रायव्हरच्या केबिन देखील प्रवाशांना दिसेल.
# विमानातील टॉयलेट प्रमाणे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज टॉयलेट्स.
# प्रवासादरम्यान लोकेशन, कुठे पोहचण्यासाठी किती वेळ लागणार याची माहिती मिळणार.
भारतातील सर्वात गतीशील इंजिनलेस ट्रेनचे नाव बदलून 'वन्दे भारत एक्स्प्रेस' करण्यात आले. सुरुवातील याचे नाव 'ट्रेन 18' असे होते. ही ट्रेन दिल्ली ते वाराणसी दरम्यान ताशी 160 किमी वेगाने प्रवास करेल. 16 कोच असलेल्या या ट्रेनच्या निर्मितीसाठी 97 कोटी रुपये खर्च करण्यात आले. ट्रेनच्या निर्मितीसाठी सुमारे 18 महिन्यांचा कालावधी लागला आहे.