Coronavirus: भारतात कोरोना बाधितांची संख्या 3577 वर तर मृतांचा आकडा 83 वर- आरोग्य मंत्रालय
भारतात (India) कोरोना बाधितांची संख्या 3577 वर पोहोचली असून 83 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
कोरोना व्हायरससारख्या (Coronavirus) महाभयाण विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. मात्र तरीही हा विषाणू हळूहळू देशवासियांना गिळंकृत करत आहे, याचा अंदाज सध्याच्या आकडेवारीतून दिसत आहे. भारतात (India) कोरोना बाधितांची संख्या 3577 वर पोहोचली असून 83 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. हा आकडा पाहता देशातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे हे दिसत आहे. हा विषाणू पसरु नये म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत मात्र तरीही या आकडेवारीवरुन याला आटोक्यात आणणे थोडे चिंताजनक झाल्याचे चित्र समोर येत आहे. गेल्या 24 तासांत 505 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
लव्ह अग्रवाल, संयुक्त सचिव, आरोग्य मंत्रालय यांनी कोरोना विषाणू वाढीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, सध्या फक्त तबलिगी जमातमुळे भारतातील कोरोना विषाणू दुप्पट होण्याच्या वेग हा 4.1 दिवस इतका आहे. जर या लोकांना यातून वगळले तर हा दर 7.5 दिवस इतका असता. भारतातील 274 जिल्ह्यांमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे समोर आली आहेत. आयसीएमआरने मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने विषाणूचे संक्रमण होऊ शकते त्यामुळे यावर बंदी घालण्यात आली आहे.
तर मुंबईत आज कोरोनाचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महानगरपालिका बृहत्तर मुंबई यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्हिडिओच्या माध्यमातून बातचीत करत लॉकडाउन वाढवायचा की नाही आता हे नागरिकांच्या हातात असल्याचे म्हटले आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी गर्दी करु नये असे वारंवार सांगण्यात येत आहे. तरीही नागरिक नियमांचे उल्लंघटन करताना दिसून येत असल्याने परिणामी कायदेशीर कारवाई करावी लागत आहे.
महानगरपालिका बृहत्तर मुंबई यांनी कोरोना संक्रमित रुग्णांबाबत अधिक माहिती दिली आहे. आज मुंबईत कोरोनाचे नवे 103 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 433 वर पोहचला आहे. त्याचसोबत 8 जणांचा आजच्या दिवसात मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 30 वर गेला आहे. तर 54 पैकी 20 जणांनी कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.