Coronavirus In India: भारतामध्ये कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 18,985 पर्यंत वाढली; आतापर्यंत 3260 लोक झाले बरे, तर 603 जणांचा मृत्यू
देशात आतापर्यंत 3260 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत
मंगळवारी संध्याकाळी दैनंदिन पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची माहिती दिली. देशात आतापर्यंत 3260 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी एका दिवसात 705 लोक बरे झाले आहेत. अशाप्रकारे लोक ठीक होण्याचे प्रमाण 17.48 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. मात्र दुसरीकडे गेल्या 24 तासांत 1336 कोरोना संक्रमणाची प्रकरणे समोर आली आहेत. अशाप्रकारे भारतामध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या 18,985 पर्यंत वाढली आहे. पैकी गेल्या 24 तासांत 47 लोक मरण पावले आहेत, अशाप्रकारे एकूण मृतांची संख्या 603 झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की 23 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 61 जिल्ह्यांत गेल्या 14 दिवसांत कोणतीही नवीन रुग्ण आढळला नाही. या यादीमध्ये चार नवीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिमचा समावेश आहे.
कोरोना विषाणूसंदर्भात 201 हॉस्पिटलची माहिती ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली आहे. डॉक्टर आणि परिचारिकांची माहितीही ऑनलाइन उपलब्ध आहे. त्याच वेळी, कोरोना विरूद्धच्या या लढाईमध्ये मदतीसाठी तब्बल 1.24 कोटी लोक एकत्र आले आहेत. कोरोनाच्या युद्धात दोन वेबसाइट्स तयार केल्या आहेत- igot.gov.in आणि covidwarriors.gov.in, यावर आपणाला कोरोनाशी संबंधित प्रत्येक माहिती मिळू शकेल. (हेही वाचा: दिल्ली: COVID-19 बाधित पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेले 16 लोकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह)
यावेळी गृह मंत्रालयाने सांगितले की. मंत्रालय सतत विविध राज्यांशी समन्वय साधत आहे आणि लॉकडाऊनच्या अंमलबजावणी लक्ष ठेवून आहे. 20 एप्रिलपासून ज्या सवलती देण्यात आल्या होत्या तिथेही काम सुरु झाले आहे. परप्रांतामधील मजुरांनाही तिथल्या राज्यांच्या शेतीच्या कामात सामावून घेण्यात आले आहे. आयसीएमआरने सांगितले की, आतापर्यंत 4 लाख 49 हजार 810 कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सोमवारी 35 हजाराहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या. तसेच सर्व राज्यांतही रॅपिड टेस्ट किटचे वितरण करण्यात आले.