कोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरजेशिवाय रेल्वे प्रवास टाळावा; रेल्वे मंत्रालयाचे आवाहन
परंतु, कोविड-19 ची कोणतीही लक्षणे नसलेल्या मजूरांना प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊनमुळे (Lockdown) देशाच्या विविध राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजूरांना स्वगृही पाठवण्यासाठी दररोज श्रमिक ट्रेन्स धावत आहेत. परंतु, कोविड-19 (Covid-19) ची कोणतीही लक्षणे नसलेल्या मजूरांना प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. मात्र कोरोनाची लक्षणे आढळणारे मजूरही प्रवास करत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान मृत्यूच्या अनेक दुर्दैवी घटना समोर येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मजूरांना विशेष आवाहन केले आहे. गरोदर महिला, 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आणि 65 वर्षांहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक यांनी गरजेशिवाय रेल्वेने प्रवास करणे टाळावे, असे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. (Lockdown: परप्रांतीय मजूरांना घरी सोडवण्यासाठी आतापर्यंत 3274 श्रमिक रेल्वे गाड्या धावल्या; 44 लाख मजूर घरी परतले)
विशेष म्हणजे गृहमंत्रालयाने देखील अशा प्रकारचे निर्देश 17 मे रोजी दिले आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर, रोगप्रतिकारकशक्ती कमी असणारे तसंच गरोदर महिला 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आणि 65 वर्षांहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक यांनी गरजेशिवाय रेल्वेने प्रवास करणे टाळावा, असे आवाहन गृहमंत्रालयाकडून करण्यात आले होते.
ANI Tweet:
रेल्वे मंत्रालय दिवसाचे 24 तास काम करत असून देशातील प्रत्येक नागरिकाला गरजेच्या वेळी प्रवास करता यावा, यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत, असे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. परंतु, कोविड-19 च्या संकटात प्रवाशांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची असल्याने आम्ही प्रवाशांकडून अधिक मदतीची अपेक्षा करत आहोत, असेही रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. तसंच आपत्तकालीन परिस्थिती मदतीसाठी रेल्वे मंत्रालयाकडून 138, 139 हे हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.