Delhi Coronavirus Update: दिल्लीमध्ये 47 लाख लोक कोरोना व्हायरसच्या संपर्कात, लोकांमध्ये दिसली नाहीत लक्षणे; Sero survey मधून समोर आले धक्कादायक सत्य

या सर्व्हेच्या निकालांवरून असे दिसून आले आहे की,

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

देशाची राजधानी दिल्लीच्या  (Delhi) कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमणाच्या बातम्यांदरम्यान, आज केंद्र सरकारने दिल्लीत झालेल्या सीरो सर्व्हेचा (Sero Survey) निकाल जाहीर केला. या सर्व्हेच्या निकालांवरून असे दिसून आले आहे की, दिल्लीत मागील 6 महिन्यांत 22.86 टक्क्यांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मात्र या लोकांमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणे दिसली नाहीत. 27 जून ते 10 जुलै या कालावधीत झालेल्या सेरो सर्वेक्षणात 21,387 नमुने घेण्यात आले, ज्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बहुतेक लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे नव्हती.

तज्ज्ञांच्या मते, सीरो सर्वेक्षणानुसार दिल्लीची लोकसंख्या जर 2 कोटी असेल तर, इथल्या सुमारे 47 लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची शक्यता आहे व हे लोक स्वतःहून बरे देखील झाले. यावरून असाही निष्कर्ष काढला जाऊ शकतो की, जुलैच्या पहिल्या आठवड्यात शहरातील प्रत्येक 4 पैकी 1 जणांना आधीच हा संसर्ग झाला आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने राज्य सरकारच्या सहकार्याने केलेल्या सर्वेक्षणात, शहरातील 11 जिल्ह्यांतील 21,387 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आयजीजी अँटीबॉडीज (IgG antibodies) संसर्गाच्या जवळजवळ तीन आठवड्यांनंतर दिसतात. यावरून जर का आता हे लोक सकारात्मक आढळले आहेत, यावरून त्यांना जूनच्या मध्यापर्यंत किंवा पूर्वीच्या काळात विषाणूचा संसर्ग झाला असावा.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या 6 महिन्यांच्या कालावधीत 23 टक्के लोकांना या साथीच्या आजाराने ग्रासले जाण्याचे प्रमुख कारण, राजधानी दिल्लीत असणारी दाट लोकवस्ती हे आहे. तसेच, सरकारच्या अर्थपूर्ण प्रयत्नांमुळे संसर्ग रोखण्यास मदत झाली, असेही या अभ्यासात सांगण्यात आले आहे. लॉकडाउन किंवा इतर प्रयत्नांमुळे, मोठ्या संख्येने लोक या आजारापासून वाचू शकले. मात्र अभ्यासामध्ये असेही म्हटले आहे की, संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी फेस-शिल्ड, मास्क आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय अजूनही चालू ठेवणे आवश्यक आहे.

दरम्यान, आज नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी कोरोना लसीविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, ऑक्सफोर्ड आणि बुवान लसीचे प्रारंभिक निकाल समाधानकारक आहेत. आता भारतामधील दोन कोरोना लस फेज-1 आणि फेज-2 ट्रायल पर्यंत आल्या आहेत. सध्या आवश्यक असणाऱ्या सर्वांना ही लस कशी उपलब्ध करुन दिली जाईल, यावर चर्चा सुरू झाली आहे. तसेच आजही भारतात दर दहा लाख लोकसंख्येमागे कोरोना विषाणू रुग्णांचे प्रमाण 837 आहे, जे जगातील बड्या देशांपेक्षा खूपच कमी असल्याचे सांगण्यात आले.