Terrorist Activities Through Social Media: सोशल मीडियाच्या माध्यमातून देशात दहशतवादी कारवाया आणि कट्टरतावादाचा धोका वाढला; गृह मंत्रालयाची माहिती
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले की, Vidley TV ने 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त 'सेवक: द कन्फेशन्स' नावाची वेब सिरीज प्रसिद्ध केली होती, जी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला प्रतिकूल असल्याचे आढळून आले.
देशात सोशल (Social Media) मीडियाच्या माध्यमातून दहशतवाद (Terror) पसरवण्याचा धोका सध्या खूप वाढला असून, ही गोष्ट भारताची एकता आणि अखंडतेला धोका असल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी म्हटले आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली. गृह मंत्रालयाने सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशातून भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले जात आहे, ज्यामध्ये कट्टरता ठळकपणे दिसून येते.
गृह राज्यमंत्री म्हणाले की, भारतातील दहशतवाद मोठ्या प्रमाणावर सीमेपलीकडून प्रायोजित केला जातो आणि जागतिक दहशतवादी गट व भारताशी वैर असलेल्या काही विदेशी एजन्सी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, इंटरनेट इत्यादी वापरून लोकांना कट्टरपंथी बनवण्याचा आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सरकारचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा, एक दिवस आधी सोमवारी सरकारने पाकिस्तानस्थित ओटीटी प्लॅटफॉर्मची वेबसाइट, दोन मोबाइल अॅप्स, चार सोशल मीडिया खाती आणि स्मार्ट टीव्ही अॅपवर बंदी घालण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. सरकारने म्हटले आहे की, या प्लॅटफॉर्मद्वारे दाखवल्या जाणार्या वेब सीरिजमुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि अखंडतेला हानी पोहोचू शकते.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले की, Vidley TV ने 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त 'सेवक: द कन्फेशन्स' नावाची वेब सिरीज प्रसिद्ध केली होती, जी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला प्रतिकूल असल्याचे आढळून आले. मंत्रालयाने सांगितले की, या वेब सिरीजचे आतापर्यंत तीन भाग रिलीज करण्यात आले आहेत. (हेही वाचा: Pakistani OTT Platform Ban: भारताची पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक, केंद्र सरकारकडून पाकिस्तानी ओटीटी प्लॉटफॉर्मवर बंदी)
मंत्रालयातील वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी ट्विट केले की, पूर्णपणे बनावट वेब सिरीज 'सेवक'चे मूल्यांकन केल्यानंतर पाकिस्तानस्थित Vidley TV वर कारवाई करण्यात आली. वेब सिरीजमध्ये ऑपरेशन ब्लू स्टार आणि त्यानंतरची घटना, अयोध्येतील बाबरी मशिदीचा विध्वंस, ग्रॅहम स्टेन्स नावाच्या ख्रिश्चन मिशनरीची हत्या आणि मालेगाव स्फोट यासह संवेदनशील ऐतिहासिक घटना आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांचे भारतविरोधी चित्रण आहे.