Telangana: लाकडी गोदामाला आग, 11 जणांचा होरपळून मृत्यू; हैदराबाद येथील घटना
या आगीत आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार सुमारे 11 जणांचा जीवंत जळून मृत्यू झाला आहे.
तेलंगणाची (Telangana) राजधानी हैदराबाद (Hyderabad) येथील भोईगुडा येथे बुधवारी पहाटे एका लोखंड आणि लाकडाच्या गोदामाला (Wooden Warehouse) भीषण आग (Fire) लागली. या आगीत आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार सुमारे 11 जणांचा जीवंत जळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत आणि बचाव कार्य करताना 11 मृतदेह बाहेर काढले आहेत. सांगितले जात आहे की, मृतांमध्ये सर्वजन हे स्थलांतरीत कामगार आहेत. जखमींची संख्याही मोठी असून त्यांचा निश्चित आकडा समजू शकला नाही. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मुशीराबाद पोलिसांतील एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 4 वाजणेच्या सुमारास सिकंदराद रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या नागरी परिसरातील एका कॉलनीत आग लागली. भोईगुडा परिसरातील आयडीएच कॉलनी हा परिसर दाट लोकवस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो. याच परिसरात एका गोडाऊनच्या वरच्या भागात 13 कर्मचारी वास्तव्यास होते. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किट झाल्याने लागली आहे.
ट्विट
आग लागताच पुढच्या काही मिनीटांतच आगीने संपूर्ण गोदाम आपल्या कह्यात घेतले. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना तत्काळ दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या पहाटे चारच्या सुमारापासून सकाळी सात वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होत्या. प्रदीर्घ प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.