Swiggy Reports Rs 33 Crore Fraud: स्विगीमध्ये माजी कर्मचाऱ्याने केला 33 कोटींचा घोटाळा; गुन्हा दाखल, तपास सुरु
गेल्या आर्थिक वर्ष 2023-24 चा ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर ही बाब समोर आली. कंपनीत 33 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Swiggy Reports Rs 33 Crore Fraud: ऑनलाइन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) कंपनी स्विगीने (Swiggy) आपल्या एका माजी कर्मचाऱ्यावर 33 कोटी रुपयांचा घोटाळा (Scam) केल्याचा आरोप केला आहे. मनीकंट्रोलच्या म्हणण्यानुसार, या कनिष्ठ कर्मचाऱ्याने गेल्या वर्षी हा घोटाळा केला. ही माहिती कंपनीच्या आर्थिक वर्ष 2024 च्या वार्षिक अहवालातून प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्विगीने ‘बाह्य टीम’ नेमली असून कर्मचाऱ्याविरुद्ध ‘कायदेशीर तक्रार’ दाखल करण्यात आली आहे. सध्या स्विगी आपली इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, त्याआधी हे प्रकरण उघडकीस आले आहे.
अहवालानुसार कंपनीला बऱ्याच काळापासून या फसवणुकीची माहिती नव्हती. गेल्या आर्थिक वर्ष 2023-24 चा ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर ही बाब समोर आली. कंपनीत 33 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले असून, यामागे कंपनीचा एक कनिष्ठ कर्मचारी आहे, ज्याने आता कंपनी सोडली आहे.
नुकतेच, 4 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, कंपनीच्या उपकंपनीच्या एका कनिष्ठ कर्मचाऱ्याने 32.67 कोटी रुपयांच्या निधीची उधळपट्टी केली आहे. ही फसवणूक गेल्या काही वर्षांत झाली आणि आता तो कर्मचारी निघून गेला आहे. 31 मार्च 2024 पर्यंत केलेल्या ऑडिटमध्ये, कंपनीला सुमारे 33 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचे आढळून आले, ज्याचा कंपनीच्या खर्चाशी काहीही संबंध नाही आणि त्याचा रेकॉर्डही उपलब्ध नाही. (हेही वाचा; Vegetarian and Non-Vegetarian Thalis Prices Drop: ग्राहकांना दिलासा! ऑगस्ट 2024 मध्ये शाकाहारी-मांसाहारी थाळीच्या किंमतीमध्ये अनुक्रमे 8 व 12 टक्क्यांनी घट- CRISIL)
स्विगी लवकरच आपला आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी एप्रिलमध्येच ड्राफ्ट पेपरही सादर करण्यात आला आहे. स्विगी आयपीओद्वारे 3,750 कोटी रुपये आणि ऑफर फॉर सेलद्वारे 6,664 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 11,247 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. त्यांचा तोटाही गेल्या वर्षीच्या तुलनेत 44 टक्क्यांनी घसरून 2,350 कोटी रुपयांवर आला आहे.