केरळ: शबरीमला प्रकरणावर स्वरा भास्करने साधला संघ, भाजपवर निशाणा म्हणाली 'भगवा दहशतवाद हा खरा आहे'
या घटनेत सहभागी असलेले बॉम्ब फेकणारे लोक आरएसएसशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. या वृत्ताचा दाखला देत स्वराने भाजप (BJP), आरएसएसवर (RSS) निशाणा साधला आहे.
Swara Bhaskar Tweet On Sabarimala Violence: दोन महिलांनी केलेल्या शबरीमला मंदिर प्रवेशावरुन केरळमध्ये जोरदार वाद निर्माण झाला आहे. या घटनेचा विरोध करण्यासाठी राज्यभरात निदर्शने आणि आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनाला आता हिंसवक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिनेही याव वादात उडी घेत‘पोलीस ठाणे अथवा कुठेही बॉम्ब फेकणाऱ्यांना दहशतवादीच म्हटले जाईल. भगवा दहशतवाद हा खरा आहे,’असे म्हटले आहे. स्वराच्या प्रतिक्रियेचा रोख हा प्रामुख्याने भाजप आणि आरएसएसवर आहे. स्वराने ही प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन दिली आहे. केरळमधील हिंसक आंदोलनात नेडुमांगडू पोलीस ठाण्यावर चार गावठी बॉम्ब फेकण्यात आले. या घटनेत सहभागी असलेले बॉम्ब फेकणारे लोक आरएसएसशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. या वृत्ताचा दाखला देत स्वराने भाजप (BJP), आरएसएसवर (RSS) निशाणा साधला आहे.
केरळ येथील शबरीमला मंदिर प्रवेश न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्व वयोगटातील महिलांसाठी खुला झाला. मात्र, न्यायालयाचा आदेश न मानता काही संस्था, संघटना, राजकीय पक्ष आणि व्यक्तिंनी या प्रवेशाला विरोध केला. त्यानंतर हा वाद प्रचंड वाढला. विकोपाला गेला. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात येऊनही अनेक महिलांना भगवान अयप्पांचे दर्शन न घेताच परत फिरावे लागले. दरम्यान, बिंदू आणि कनकदुर्गा नावाच्या दोन महिलांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास मंदिर प्रवेश केला आणि ऐतिहासिक कामगिरी पार पाडली. या दोन महिलांनी भगवान अयप्पांचे दर्शन घेतल्याने इतिहास घडला.
दरम्यान, बिंदू आणि कनकदुर्गा यांनी भगवान अयप्पांचे दर्शन घेतल्यानंतर केरळ राज्यातील सामाजिक स्थिती प्रचंड बिघडली. अनेक ठिकाणी आंदोलने झाली. काही ठिकाणी हिंसाचारही झाला. कन्नूर, पेराम्ब्रा, मलापुरम, अदूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (हेही वाचा, केरळच्या Sabarimala Temple बद्दल या '11' इंटरेस्टिंग गोष्टी वाचून तुम्ही थक्क व्हाल!)
दरम्यान, केरळमध्ये सुरु असलेल्या आंदोलने आणि हिंसाचारावरुन आता राजकारण सुरु झाले असून, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.