भारतातून फरार झालेल्या नित्यानंद बाबाने स्थापन केला नवा देश 'कैलास'; मंत्रिमंडळ, झेंडा, पासपोर्ट असा असेल थाट

अशात Kailaasa.org नावाची एक वेबसाईट समोर आली आहे. या वेबसाईटवरून असे दिसून येत आहे की, नित्यानंदने चक्क आपला स्वतःचा नवीन देश स्थापन केला आहे.

Swami Nithyananda (File Image)

स्वयंभू बाबा नित्यानंद (Nithyananda) याच्यावर, त्याच्या अहमदाबाद येथील आश्रमात अनुयायांकडून देणग्या गोळा करण्याच्या उद्देशाने, अल्पवयीन वयाच्या वापर केल्याचा आरोप आहे. याबाबत दोघांना अटक झाली असून, फरार झालेल्या नित्यानंदचा  गुजरात पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अशात Kailaasa.org नावाची एक वेबसाईट समोर आली आहे. या वेबसाईटवरून असे दिसून येत आहे की, नित्यानंदने चक्क आपला कैलास (Kailaasa) नावाचा स्वतःचा नवीन देश स्थापन केला आहे. आपल्या नवीन देशासाठी त्याने नवीन ध्वज, नवीन राज्यघटना आणि नवीन प्रतीक देखील निश्चित केले आहे.

वेबसाइटनुसार, फरार स्वयंभू बाबा नित्यानंद याने 'हिंदू सार्वभौम राष्ट्रा’ची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर, त्याच्याकडे तथाकथित ‘कैलास; देशाचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळही आहे. वृत्तसंस्था आयएएनएसच्या वृत्तानुसार, वेबसाइटवर या नवीन कैलास देशासाठी देणग्या देण्याचे आवाहन केले गेले आहे. ज्याद्वारे देणगीदारांना ‘महान हिंदु राष्ट्राचे’ नागरिकत्व मिळण्याची संधी मिळू शकते.

ही वेबसाइट 21 ऑक्टोबर 2018 रोजी तयार केली गेली आहे आणि ती अखेर 10 ऑक्टोबर 2019 रोजी अपडेट केली गेली होती. वेबसाइटची नोंदणी पनामा येथील असून, तिचा आयपीआय अमेरिकेच्या डलास येथील आहे. वेबसाइटमध्ये म्हटले आहे की, नागरिकांना कैलासचा स्वतंत्र पासपोर्ट देण्यात येईल, आणि परमशिवाच्या आशीर्वादाने पासपोर्टधारक कैलाससह इतर 11 दिशेतील 14 देशांत जगात प्रवेश करू शकतात. (हेही वाचा: मुलांचे अपहरण आणि बलात्काराच्या आरोपानंतर वादग्रस्त बाबा 'स्वामी नित्यानंद' देश सोडून फरार; शोध सुरु)

वेबसाइटनुसार, या हिंदू राष्ट्राचा स्वतःचा ध्वज आहे, ज्याला ‘ऋषभ ध्वज' म्हणून ओळखले जाते. कैलासमध्ये शिक्षण, वित्त, वाणिज्य इत्यादी अनेक सरकारी विभागही असतील. याशिवाय 'कैलास' मध्ये एक प्रबुद्ध नागरिकत्व विभागदेखील असेल जो सनातन हिंदू धर्म पुनरुज्जीवित करण्यासाठी कार्य करेल. तर अशाप्रकारे भारतातून पळून गेल्यावर नित्यानंद नव्या कैलास देशाला आकार देताना दिसून येत आहे.